मनपासमोर वसुलीचे आव्हान : शहरात 1 लाख 48 हजार मालमत्ताधारक
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विविध मालमत्ताधारकांकडे 25.77 कोटी रुपयांची थकबाकी आहे. 2018 पासून 1 लाख 48 हजार मालमत्ताधारकांकडे थकबाकी राहिली आहे. त्यामुळे मनपाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे मालमत्ता कराची वसुली होत नसल्याने मनपासमोर वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे मनपाने येत्या काळात थकबाकीच्या वसुलीवर भर देण्याची गरज आहे.
महापालिका व्याप्तीत 413 व्यावसायिक दुकाने व 1 लाख 48 हजार 82 मालमत्ताधारक आहेत. मागील काही वर्षांपासून थकबाकी वसुली स्थगित झाली आहे. शिवाय हजारो जुन्या मालमत्ताधारकांचे पुनर्मूल्यांकन झाले नाही. त्यामुळे अडचणी वाढू लागल्या आहेत. मनपाकडे 1 लाख 48 हजार मिळकती असल्या तरी केवळ 1 लाख 20 हजार मिळकतींवर कर आकारला जातो. उर्वरित मालमत्ताधारकांकडून अपेक्षित प्रमाणात करवसुली होत नाही. त्यामुळे थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे.
2018 ते 2022 या कालावधीत शहरातील मालमत्ताधारकांकडे 25.77 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे मनपासमोर थकबाकीचा मोठा डोंगर उभा आहे. 2018 पासून अतिवृष्टी, कोरोना, लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे थकबाकी राहिली आहे. 2019 अतिवृष्टी, 2020-21 मध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे करवसुली थांबली होती. 2019-20 मध्ये 40 कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट होते. मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बळ्ळारी नाल्याला पूर आला. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वेळेत करवसुली झाली नसल्यामुळे 10 कोटीची थकबाकी राहिली.









