अधिवेशन काळात ताण वाढणार : बसेसचा तुटवडा असल्याने परिवहनसमोर प्रश्न
बेळगाव : शैक्षणिक सहलींसाठी दररोज मध्यवर्ती बसस्थानकातून 20 ते 25 बस धावत आहेत. मात्र, अधिवेशनाच्या काळात शैक्षणिक सहलींसाठी बस पाठविताना डोकेदुखी वाढणार आहे. आधीच शक्ती योजनेमुळे बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यात आता शैक्षणिक सहली आणि अधिवेशनाचा ताण परिवहनवर वाढणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जाते. शिवाय शाळांनी सहलींसाठी परिवहनची बस बुकिंग करावी, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी सहली काढणाऱ्या शाळा व्यवस्थापकांकडून बसेस बुकिंग केल्या जात आहेत. त्यामुळे परिवहनच्या हंगामी व्यवसायाला प्रारंभ झाला आहे. मात्र, परिवहनच्या ताफ्यात बसेसचा तुटवडा असल्याने शैक्षणिक सहलींसाठी बस पाठविताना परिवहनची दमछाक होऊ लागली आहे. सद्यस्थितीत दररोज शैक्षणिक सहलींसाठी 25 ते 30 बसेस विविध मार्गांवर धावू लागल्या आहेत. इतर ठिकाणाच्या बसफेऱ्या कमी करून शैक्षणिक सहलींना बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, पुढील आठवड्यापासून अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, प्रशासनाकडून 100 बसेसची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक सहली आणि अधिवेशनासाठी परिवहन कशाप्रकारे बसचे नियोजन करणार, असा प्रश्न पडू लागला आहे.









