प्रतिनिधी / ओरोस:
सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी बांधकाम अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हय़ातील सुमारे 25 हजार नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांना सुरक्षा कीट वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे 450 कामगारांना याचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी इमारत बांधकाम कामगार, प्रभारी अधिकारी किरण कुबल यांनी यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने इमारत बांधकाम कामगारांना देण्यात येणारे सुरक्षा कीट वाटप हे मागील तीन-चार महिन्यांपासून थांबविण्यात आले होते. मात्र, कोरोना प्रादुर्भाव आता जिल्हय़ात कमी प्रमाणात असल्याने प्रशासनाने सुचविलेल्या सर्व नियमांचे पालन करून सरकारी इमारत बांधकाम अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हय़ातील नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांना ओरोस फाटा येथील गोविंद कॉम्प्लेक्स येथे या सुरक्षा कीटचे वाटप चार दिवसांपूर्वी चालू करण्यात आले आहे. जिल्हय़ातील 25 हजार नोंदणीकृत इमारत कामगार बांधकाम कामगारांना याचा लाभ होणार आहे, असे प्रभारी कामगार अधिकारी किरण कुबल यांनी सांगितले. हा लाभ टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे तर याकरिता मुंबई येथील गुणाणी कमर्शियल, प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई चर्चगेट तसेच इंडो अलाईट प्रोटीन फुड, प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे कीट वाटपाचे टेंडर देण्यात आले आहे. या कीटमध्ये हेल्मेट, शुज, जाकेट, बॅटरी, हॅन्डग्लोज आदी वस्तू दिल्या जात आहेत. याकरिता कौस्तुभ लवेकर, मीनाद लवेकर यांची कीट वाटपासाठी एजन्सीच्यावतीने नेमणूक करण्यात आली आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगार ओळखपत्र, आधारकार्ड, बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स आदी कागद व नोंदणीकृत लाभार्थी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
ज्या कामगारांची नोंदणी 27 जानेवारी 2020 पर्यंत झालेली आहे, त्या कामगारांना या कीटचे वाटप करण्यात येईल. ज्या कामगारांची जन्मतारीख 1 -1-1961 व त्यानंतरची आहे त्यांनाच हे कीट वाटप करण्यात येणार आहे. 90 दिवसांचे काम केलेल्या कामगारांना, कॉन्ट्रक्टर किंवा काम केलेल्या मालकाच्या स्टॅम्पस व सहीची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. eteDuration









