हॉलिवूडमधील बहुचर्चित जेम्स बाँड सीरिजचा 25 वा चित्रपट ‘नो टाईम टू डाय’ जगातील आतापर्यंतच्या सर्वात महाग प्रीमियरसह सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. लंडनच्या भव्य प्रीमियरसाठी निर्मात्यांनी 100 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. चित्रपटाच्या निर्मितीत सामील सर्व लोकाहंसाठी लंडनच्या वेंबले एरिना स्टेडियममध्ये वेगळा प्रीमियर आयोजित करण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन 4 वेळा टाळण्यात आले आहे.
चित्रपटाचा प्रमोशनल टूरही चीन आणि भारतासह अनेक देशांमध्ये रोखण्यात आली होती. या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे, कारण डॅनियल क्रेगच्या भूमिकेतील हा अखेरचा बाँडपट आहे. यानंतर नवा बाँड दिसून येणार आहे. एमजीएम, युनिव्हर्सल आणि बाँड प्रॉडय़ूसर यांनी याची निर्मिती केली आहे.

एप्रिल 2020 पासून तयार या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर मागील वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. नो टाईम टू डायच्या निर्मात्यांनी जगभरातील बाँड प्रशंसकांच्या आग्रहावरच चित्रपटाचे प्रदर्शन टाळले होते. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर न जाण्याची घोषणा केली होती. तर बाँड सीरिजसाठी चीन चांगली बाजारपेठ असल्याचे मानले जाते. सीरिजचा मागील चित्रपट ‘स्पेक्टर’ने चीनमध्ये 800 कोटी रुपयांची कमाई केली होती.









