केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ‘संडे संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रविवारी कोरोना लसीसंबंधी महत्त्वाची माहिती दिली. जुलै 2021 पर्यंत भारतातील 25 कोटी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या लसीकरण मोहिमेसाठी भारतात 400 ते 500 दशलक्ष डोसचा पुरवठा करण्याची सरकारची योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी त्यांनी 2021 च्या प्रारंभी लस येणार असल्याचे सुतोवाच केले होते.
भारतात कोरोना प्रतिबंधक लसीची 2/3 टप्प्यातील चाचणी सुरू आहे. भारतीय वैज्ञानिकांनी यापैकी दोन लसी विकसित केल्या आहेत. याच अनुषंगाने कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार याची सविस्तर माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत साधारणपणे भारतातील 20 ते 25 कोटी लोकांना ही लस देण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. ही लस पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱयांना दिली जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कोणत्या लोकांना सर्वात प्रथम लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबर अखेरपर्यंत सूचना मागवल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून ही महामारी कधी संपुष्टात येणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे. जगभरात कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर जगभरात 150 हून अधिक लसींवर संशोधन आणि चाचणी सुरू आहे.
चलनी नोटांद्वारेही संक्रमणाचा धोका
संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार अद्याप कमी होताना दिसत नाही. भारतातही बाधितांची संख्या मोठी असून सावधगिरीच्या उपाययोजना गंभीरपणे घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. संक्रमण वाढत असतानाच आता आरबीआयने चलनी नोटांद्वारेही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा दिल्यामुळे देशवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. चलनी नोटांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे जीवाणू आणि विषाणू एका हातातून दुसऱया हातात पसरू शकतात. म्हणूनच लोकांनी चलन वापरण्याऐवजी अधिकाधिक डिजिटल व्यवहार केले पाहिजेत, असे आरबीआयने म्हटले आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टेडर्सने (सीएआयटी) अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक पत्र लिहून चलनी नोटांपासून असलेल्या धोक्याबाबत विचारणा केली होती. या पत्राला प्रतिसाद देताना आरबीआयने नोटांमधूनही विषाणू संक्रमणाचा धोका संभवू शकतो, असे स्पष्ट केले आहे.