वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी अविश्वास ठरावावर लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली, असे म्हणत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. यावरून प्रचंड गदारोळ झाला. राहुल मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत गोंधळ केला. सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर राहुल गांधी यांच्या या भाषणातील एकूण 24 शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात हत्या हा शब्द 15 वेळा वापरला होता. तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील हत्या हा शब्द वापरला होता. तो संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला आहे. हत्या शब्दाबरोबर कत्ल, देशद्रोही शब्द दोनदा, आणि मर्डर, हत्यारा, हे शब्द एकदा वापरण्यात आले होते. हे सर्व शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी संसदेत एकूण 37 मिनिटे भाषण केले. अविश्वास प्रस्तावादरम्यान आपल्या भाषणात मणिपूरच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी 15 मिनिटे 42 सेकंद भाषण केले.









