जळगाव / प्रतिनिधी :
दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला प. न. लुंकड कन्याशाळेच्या केंद्रावर एका वर्गात इंग्रजी लोअर अभ्यासक्रमाऐवजी हायर अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांनी दिली. विद्यार्थ्यांनी तक्रार करून देखील त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले गेले. पेपर झाल्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन केंद्र संचालकांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. या प्रकरणी शिक्षण मंडळाला कळवण्यात आले असून, याची गंभीर दखल घेत बोर्डाने या बाबतचा अहवाल मागवला आहे.
सोमवारी इंग्रजी तृतीय भाषेचा पेपर होता. प. न. लुंकड कन्याशाळेत एका वर्गात असलेल्या 24 परीक्षार्थी विदयार्थ्यांना हा तृतीय भाषेचा पेपर न देता कोड 3 असलेल्या इंग्रजी हायरची प्रश्नपत्रिका दिली गेली. प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी व अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न पाहता विदयार्थ्यांनी ही आमची प्रश्नपत्रिका नाही. चुकीची प्रश्नपत्रिका दिली गेल्याची तक्रार प्रश्नपत्रिका हातात पडताच पर्यवेकांकडे केली. मात्र, पर्यवेक्षकांनी जस येईल, तसे लिहा सांगत वेळ मारून नेली. त्यांनी तात्काळ केंद्र संचालकांच्या कानावर ही बाब घालणे गरजेचे होते. मात्र, तसे घडले नाही. पेपर संपल्यावर मुलांनी पालकांना ही बाब सांगितली. त्यानंतर पालकांनी केंद्र संचालकांकडे धाव घेत चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याचे सांगितले. अखेर केंद्र संचालक यांनी बोर्डाला फोनवर ही बाब सांगितली असता ताबडतोब याचा अहवाल पाठवण्यास सांगितले. शाळा या प्रकरणी आता सारवासारव करत असून, नेमका काय अहवाल पाठवला जातो, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.








