राहुल गांधींकडून ‘डिनर’चे आयोजन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीत गुरुवारी रात्री ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आमंत्रणानुसार त्यांच्या निवासस्थानी आयोजित ‘डिनर’ बैठकीमध्ये 24 पक्षांचे 50 हून अधिक नेते आणि खासदार पोहोचले होते. ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसीसह सपा, राजद, शिवसेना, द्रमुक, राष्ट्रवादी आणि सीपीआयचे नेतेही उपस्थित होते. ‘
यात देशाच्या सध्याच्या राजकारणावर आणि विशेषत: निवडणूक आयोगाच्या कृतीवर चर्चा झाली. तसेच उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक आणि बिहारमधील मतदार यादी सर्वेक्षणावरही चर्चा झाल्याचे समजते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बिहारमधील ‘एसआयआर’च्या मुद्यावर सर्वांनी एकत्रितपणे आवाज उठवण्यावर चर्चा झाली. या मुद्यावर संसदेत निषेध सुरूच राहील आणि आम्ही संसदेत चर्चा करण्याची मागणी करत राहू, असे राहुल गांधी यांनी नेत्यांना सांगितले. तसेच आम्ही उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवार देऊ.

इंडिया अलायन्सच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा होऊन उमेदवार ठरविला जाईल, असेही सांगण्यात आले. तथापि, जर सरकारने आमच्याशी कोणत्याही एखाद्या नावावर संपर्क साधला तर त्यावर विचार केला जाईल, परंतु सरकारच्या ट्रॅक रेकॉर्डवरून तसे दिसत नाही, असे मत काहींनी व्यक्त केले.









