कराड पोलीसांच्या मोहिमेत २४ गहाळ मोबाईल्स जप्त
कराड : गहाळ झालेले २४ मोबाईल वडूज पोलिसांनी हस्तगत करून एकूण ४ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज जमा करून सबंधित व्यक्तींना परत केला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी वडूज पोलीस ठाण्यास भेट दिली होती. यावेळी गहाळ झालेले मोबाईल पोलिसांनी संबंधित व्यक्तींना परत केले.
याबाबत अधिक माहिती अशी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांनी हरवलेले मोबाईल शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार शिवाजी खाडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका पवार यांना सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सी.ई.आय. आर पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे महाराष्ट्र व इतर राज्यातून हस्ते परहस्ते मोबाईलधारकांशी वारंवार संपर्क करुन सदरची मोहीम राबवली.
या मोहिमेतून ४,३२,००० रुपये किमतीचे एकूण २४ मोबाईल हस्तगत करण्यात वडूज पोलिसांना यश आले. सदरची मोहीम वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सातत्याने राबवण्यात येणार असल्याने घनश्याम सोनवणे यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागिय पोलीस अधिकारी सांवत, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे व प्रियांका पवार यांनी केली आहे.








