पाईपलाईनसाठी खोदाई केल्यामुळे सार्वजनिक नळांचा पाणीपुरवठा बंद : ऐन उन्हात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती, योजनेसाठी आठ कोटी मंजूर
वार्ताहर /कंग्राळी बुद्रूक
कंग्राळी बुद्रूक ग्रा. पं. ला शासकीय निधीतून घरोघरी 24 तास नळांना पाणीपुरवठा योजनेसाठी 8 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ही महिलावर्गासाठी आनंदाची बाब आहे. परंतु या योजनेचे गाजर दाखवत गेल्या तीन महिन्यापासून पाईपलाईन खोदाई कामामुळे सार्वजनिक नळांना पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ऐन उन्हात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. खोदाईचे काम अगदी धिम्यागतीने होत आहे. परंतु ग्रा. पं. ला याचे कोणतेच सोयरसुतक नसल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी ‘तरुण भारत’मधून 24 तास घरोघरी नळांना पाणी असे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर महिलावर्गाच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. गेले कित्येक दिवस सार्वजनिक नळांना आठ दिवसातून एकदा पाणी येत होते. परंतु आता आम्हाला दररोज ताजे व भरपूर पाणी मिळणार म्हणून महिलावर्गाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. परंतु 24 तास पाणी मिळण्याची ही योजना डोळ्यासमोर ठेवून गेले तीन महिने कंग्राळी बुद्रूकवासीय पाण्यासाठी भटकंती करत आहेत. मध्यंतरी काही ग्रा.पं. सदस्यांनी स्वत: आपापल्या वार्डांमध्ये पाण्याचे टँकर दाखल करून थोडा नागरिकांना दिलासा देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु नागरिकांच्या रोजच्या पाण्याच्या वापरासमोर हे टँकर कुठे लागणार? अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.
कंग्राळी गावाला कुणी वाली आहे की नाही?
24 तास घरोघरी नळांना पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून 8 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. गेल्या तीन महिन्यापासून खोदाईचे काम चालू आहे. अजून जवळजवळ अर्ध्याहून अधिक गावांमध्ये खोदाई करणे बाकी आहे. काम अगदी संथगतीने सुरू आहे. नागरिकांचे पाण्यासाठी कसे हाल होत आहेत. हे अनेकवेळा ‘तरुण भारत’मधून यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करूनसुद्धा कोणा शासकीय अधिकाऱ्याने किंवा लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष दिले नाही. काम संथगतीने सुरू आहे. नागरिक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. परंतु शासनाच्या या निधीचे काय? या निधीचा उपयोग नागरिकांना त्यांच्या योग्य वेळेत होणे गरजेचे आहे. आणि ही पाहणी शासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी करणे गरजेचे आहे, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी
मृग नक्षत्राची सुरुवात येत्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु खोदाई कामाचा जोर म्हणावा तसा नाही. जर पावसाला सुरुवात झाली तर खोदाईमुळे संपूर्ण गावभर चिखलाचे साम्राज्य तयार होईल. ही कल्पना डोळ्यासमोर आणून ग्रा.पं. सदस्य शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी त्वरित लक्ष घालून खोदाईचे काम पूर्ण करून घरोघरी 24 तास पाणीपुरवठा योजना सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
पाण्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड
गेले तीन महिने सार्वजनिक नळांना पाणी येणे बंद झाल्यामुळे नागरिकांना रोजच्या पाण्याच्या दैनंदिन वापरासाठी खासगी टँकर मालकाकडून पाणी घ्यावे लागत आहेत. टँकरला 400 ते 500 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच शेतातील विहिरीतील सायकल किंवा दुचाकीवरून पाणी आणावे लागत आहे. मध्यंतरी कलमेश्वर गल्लीच्या नागरिकांनी पाण्यासाठी ग्रा. पं. वर धडक मोर्चा काढला. यावेळी उपस्थित ग्रा. पं. सदस्याने काम लवकर पूर्ण करेपर्यंत जुन्या पाईपलाईनमधून पाणी सोडू असे आश्वासन दिले. दोन चार दिवस नळांना पाणी आले, परंतु येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती झाली.
लक्ष्मी गल्ली, चव्हाट गल्लीतील महिलांचा ग्रा. पं.वर मोर्चा
गेल्या चार दिवसापूर्वी लक्ष्मी गल्ली व चव्हाट गल्लीतील महिलांनी ग्रा.पं. वर पाण्यासाठी मोर्चा काढला. यावेळी ग्रा. पं.मध्ये कुणी उपस्थित नसल्याचे दिसून आले. ग्रा. पं.ही नागरिकांची समस्या जाणून घेण्याची व त्यांचे निरसन करण्यासाठी शासनाने सुरू केलेली योजना आहे. या योजनेच्या तक्रारींचे निवारण करणे व त्या सोडविण्यासाठी शासनाने ग्रा. पं.ची निर्मिती केली आहे. या ठिकाणी कुणीच उपस्थित राहीले नाही. तर नागरिकांनी समस्या कुणाला सांगायच्या? अशा प्रतिक्रिया मोर्चातील महिलांनी व्यक्त केल्या. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील यांनी महिलांना उद्यापासून नळांना पाणी सोडण्याची व्यवस्था करू, असे सांगितले व परंतु नळांना पाणी आले नाही. यावेळी उपस्थित महिलांनी पावसाळ्यापूर्वी नळांना पाणी सुरू करून आम्हाला दिलासा देण्याची मागणी केली.









