रामपूर काडतूस प्रकरण : 13 वर्षांनंतर आला निर्णय, दोषींना दंडही भरावा लागणार
► वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशातील बहुचर्चित काडतूस व शस्त्रास्त्र प्रकरणात रामपूर जिल्हा न्यायालयाने 20 पोलिसांसह 24 दोषींना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी शिक्षा सुनावताना रामपूर न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विजय कुमार यांनी सर्व दोषींना प्रत्येकी 10 हजार ऊपयांचा दंडही ठोठावला. 2010 च्या या 13 वर्षे जुन्या प्रकरणात गुऊवारी न्यायालयाने 24 जणांना दोषी ठरवले होते. त्यानंतर शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली.
उत्तर प्रदेशातील बहुचर्चित काडतूस प्रकरणात रामपूरच्या जिल्हा न्यायालयाने शुक्रवार, 13 ऑक्टोबरला 24 पैकी 22 दोषींना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावली, तर 2 दोषींना प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली. सीआरपीएफचे कॉन्स्टेबल विनोद कुमार आणि विनेश कुमार यांना शस्त्रास्त्र कायद्यान्वये सात वर्षांचा तुऊंगवास आणि प्रत्येकी 10,000 ऊपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी सर्व दोषींना कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी तुऊंगात करण्यात आली.
या प्रकरणातील दोषींवर शस्त्रास्त्र कायद्यान्वये सरकारी पैशाचे नुकसान करणे, चोरीच्या मालमत्तेचा ताबा ठेवणे, गुन्हेगारी कट रचणे यासह गुन्हा दाखल करण्यात आला होता. दंतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफ जवान हुतात्मा झाल्यानंतर हल्ल्यात वापरलेली काडतुसे रामपूर येथून पाठवण्यात आल्याची गुप्त माहिती एसटीएफला मिळाली होती. लखनौ एसटीएफच्या पथकाने 29 एप्रिल 2010 रोजी रामपूरमध्ये छापा टाकत यासंबंधी कारवाई केली होती. याप्रकरणी एसटीएफने निवृत्त पीएसी इन्स्पेक्टर यशोदानंदन, सीआरपीएफ हवालदार विनोद कुमार आणि प्रयागराज येथील रहिवासी विनेश यांना राम रहीम पुलाजवळ अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून 1.75 लाख ऊपये रोख, काडतुसे आणि शस्त्रे जप्त करण्यात आली होती. त्याच दिवशी मुरादाबाद येथून पीटीसीमध्ये तैनात असलेल्या नथीराम सैनीलाही अटक करण्यात आली होती.









