बेकायदा रोकड-दारूवर करडी नजर : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यामध्ये बेकायदा दारू वाहतूक, रोकड याविरोधात ठोस पाऊल उचलले आहे. यासाठी इतर राज्यांच्या सीमांवर 24 चेकपोस्ट उभारण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
बेळगावमध्ये महाराष्ट्र व गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारू तसेच रोकड येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगण्यात आली आहे. महाराष्ट्र सीमेवर 20 तर गोव्याच्या सीमेवर 4 चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. याचबरोबर अंतर्गत भागामध्येही विविध ठिकाणी चेकपोस्ट उभे केले आहेत. त्याठिकाणी पोलीस व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे.
आतापर्यंत 1 कोटीहून अधिक रुपयांची रोकड तसेच लाखो रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. यापुढेही ही कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आचारसंहिता भंग होऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे. निवडणूक आयोगाने जे आदेश दिले आहेत, त्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.









