वाई तालुक्यात शुक्रवारी रात्री पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत 24 बंद घरे फोडून सोने, रोख रकमेसह लाखोंचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम शनिवारी सायंकाळपर्यंत सुरु होते. त्यामुळे चोरटय़ांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
शुक्रवारी मध्यरात्री पसरणी (11), कुसगांव (4), ओझर्डे(5),सिद्धनाथवाडी(4) येथील 24 बंद घरांची कुलपे तोडून सोने व रोख रकमेसह मोठा ऐवज लंपास केला. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांनाच चोरटय़ांनी आव्हान दिले आहे. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून संतापाची लाट उसळली आहे. वाई तालुक्यातील चोरीच्या घटना घडलेल्या गावांतील घरे बंद होती. या घरातील लोक हे कामानिमित्त पुणे, मुंबई येथे राहतात अशाच घरांना चोरटय़ांनी लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. एका रात्रीत सर्वाधिक घरे फोडण्याची ही तालुक्यातील पहिलीच मोठी घटना आहे.
या चोऱ्यांमागे सराईत गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, तसेच सर्वच घरे बंद असल्याने मारहाण व जबरदस्तीच्या घटना घडल्या नाहीत. रात्री झालेल्या चोऱ्यांची माहिती शनिवारी सकाळी पोलीस पाटलांनी पोलीस ठाण्यात दिली. ताबडतोबीने पोलिस ठाण्याचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच शॉन पथक, फिंगर प्रिंट टीम, स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथक, घटना स्थळी दाखल झाले. या चोरटय़ांनी रेकी करून वाई व भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत घरफोडय़ा केल्याने पोलीसदल हादरून गेले.भुंकणाया कुत्र्यांना जखमी केल्याचे निदर्शनास आले. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून संतापाची लाट उसळली आहे.चोरटय़ांनी यासाठी दुचाकींचा वापर केल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, परिविक्षाधीन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेशकुमार मीना,पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे (वाई) भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत चोरटय़ांचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी टीम रवाना केल्या आहेत.








