आतापर्यंत 16 किलोमीटरच्या जलवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण : योजना पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी
प्रतिनिधी / बेळगाव
24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी संपूर्ण शहरात 900 किलोमीटरच्या जलवाहिन्या घालण्यात येणार असून यापैकी 16 किलोमीटरच्या जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जलकुंभ असलेल्या 16 ठिकाणी जलवाहिन्यांचे जाळे घालून परिसरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रस्ताव असून येत्या डिसेंबरअखेर हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती पायाभूत सुविधा विभागाचे कार्यकारी अभियंते अशोक बुरकुले यांनी दिली.
महापालिका व्याप्तीमधील 58 पैकी 10 वॉर्डांमध्ये चोवीसतास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. योजनेचा विस्तार करण्यासाठी 805 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी 635 कोटीचे अनुदान जागतिक बँकेकडून मंजूर झाले आहे. त्यामुळे 48 वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरणास प्रारंभ झाला आहे. 48 वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी 900 किलोमीटर जलवाहिन्यांचे जाळे घालण्यात येणार आहे. सध्या कणबर्गी, लक्ष्मीटेकडी, टीचर्स कॉलनी, जुना धारवाड रोड, खासबाग, हिंदवाडी, गोवावेस ते उद्यमबाग, राणी चन्नम्मानगर अशा विविध परिसरात मुख्य जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. 900 पैकी 16 किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. जलवाहिन्या घालण्यासाठी रस्ता खोदाई करण्यात येत असल्याने रस्ता खराब होत आहे. त्यामुळे रस्त्याची डागडुजी कधी होणार, याबाबत विचारले असता, या जलवाहिन्यांची हायड्रोटेस्ट झाल्यानंतर रस्त्याची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंते अशोक बुरकुले यांनी दिली. जलवाहिन्या घातल्यानंतर लागलीच डांबरीकरण केल्यास रस्ता खचण्याची शक्मयता अधिक आहे. त्यामुळे जलवाहिन्या घातल्यानंतर चरी बुजवून व्यवस्थित करण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण दुरुस्तीचे काम उत्कृष्ट करण्यात येणार असल्याचे अभियंते बुरकुले यांनी सांगितले.
वनखात्याकडे परवानगीचा प्रस्ताव
चोवीसतास पाणीपुरवठा करण्यासाठी हिडकल योजनेतील 9 किलोमीटरच्या जलवाहिन्या घालण्यात येणार आहेत. यापैकी 2.7 किलोमीटर अंतराची जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण झाले असून चार किलोमीटरच्या जलवाहिन्या वन खात्याच्या मालकीच्या जागेमधून घालण्यात येणार आहेत. त्यामुळे वनखात्याकडे परवानगीचा प्रस्ताव दिला असून परवानगी मिळाल्यानंतर काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच चोवीसतास पाणीपुरवठय़ाकरिता 16 जलकुंभांची उभारणी करण्यात येणार आहे. पण सध्या यापैकी उद्यमबाग, कावेरीनगर, गणेशपूर अशा तीन ठिकाणी जलकुंभ उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उर्वरित जलकुंभ उभारण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
चोवीसतास पाणी पुरवठय़ाकरिता जलकुंभ उभारण्याचे काम सुरू केले आहे. पण यापूर्वी काही ठिकाणी ओव्हरहेड जलकुंभ उभारल्याने त्या जलकुंभांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे अशा 16 उपनगरात डिसेंबर अखेरपर्यंत जलवाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच चोवीस तास पाणी योजनेंतर्गत नळ जोडण्या देऊन पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या काही भागातील रस्ते खराब झाल्याने रस्ता विकासाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे रस्ते करण्यापूर्वी जलवाहिन्या घालण्यात येणार आहेत.
राणी चन्नम्मानगर पहिला व दुसरा स्टेज, घुमटमाळ, मृत्युंजयनगर, संभाजी उद्यान परिसरात येणारा महाद्वार रोड, अलारवाड, बसवणकुडची केएचबी कॉलनी, आंबेडकरनगर, विश्वेश्वरय्यानगर, चन्नम्मा सोसायटी, अंजनेयनगर, माळमारुती, कावेरीनगर, अयोध्यानगर, कणबर्गी या परिसरात पहिल्या टप्प्यात चोवीसतास पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. जानेवारी-2023 पर्यंत या भागात चोवीसतास पाणी मिळणार आहे.









