आवश्यक माहिती देण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील दहा वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना 24 तास पाणी मिळत असल्याने शहरातील अन्य वॉर्डांमध्ये योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. याकरिता सर्वेक्षणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून आवश्यक माहिती मिळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एल. ऍण्ड टी कंपनीच्या प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
शहरातून 58 वॉर्डांपैकी 3, 4, 5, 6, 7, 80, 44, 45, 46 आणि 48 अशा दहा वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा केला जातो. 11 हजार 87 ग्राहक असून, 24 तास पाण्याचा लाभ घेत आहेत. 24 तास पाणीपुरवठा केल्यामुळे 12 टक्के पाण्याची बचत झाली आहे. तसेच 100 टक्के पाणी बिल वसुली होत असून वीजबचतही होत आहे. त्यामुळे उर्वरित 48 वॉर्डांमध्ये योजनेचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. याकरिता एल. ऍण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आल्याने सध्या घरोघरी जाऊन ग्राहक सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात येत आहे. पण नागरिकांकडून आवश्यक कागदपत्रे आणि माहिती मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे योजनेची अंमलबजावणी करण्यास विलंब लागण्याची शक्मयता आहे. या माहितीच्या आधारे 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक गल्लीमध्ये किती ग्राहक आहेत त्या आधारे जलकुंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांच्या संख्येनुसार जलवाहिन्यांची क्षमता ठरविण्यात येणार आहे. योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्याकरीता माहिती जमा करणे बंधनकारक आहे.
एल. ऍड. टी. कंपनीचे प्रतिनिधी प्रत्येक घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. त्यांना घरमालकाचे नाव, पत्ता आणि विविध माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले आहे.









