त्रैमासिक बैठकीत नागरिकांची मागणी : स्मशानभूमी-संगणक उताऱयाबाबतही चर्चा : जि.पं. बैठकीत पाणी मोफत देण्यासाठी उठविला आवाज
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुक्मयातील जलनिर्मल योजनेंतर्गत सर्वच गावांमधील प्रत्येक घराला नळ जोडणी करून आता 24 तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, या योजनेसाठी लाभार्थ्यांच्या नळाला मीटर जोडण्यात येणार आहे. त्यामुळे जेवढे बिल येईल तेवढे ते द्यावे लागणार असल्याने नागरिकांतून संताप क्यक्त करण्यात आला. पैसे भरून पाणी घ्यायचे असेल तर आम्हाला ही योजनाच नको. पाणी मोफत द्यावे, असा आवाज जुन्या जिल्हा पंचायतमध्ये झालेल्या त्रैमासिक केडीपी बैठकीत नागरिकांनी उठविला.
यमकनमर्डी कार्यक्षेत्रात येणाऱया तीन जिल्हा पंचायत सदस्यांच्या कार्यक्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. यावेळी काकती, कडोली, हुदली येथील जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा विभागातर्फे राबविण्यात येणाऱया नवीन योजनेसंदर्भात चर्चा सुरू असताना नागरिकांनी याला विरोध केला आहे. तालुक्मयात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याकडे लक्ष देण्यात येत नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पैसे देऊन 24 तास पाणी योजना नको
तालुक्मयातील अनेक निरुपयोगी कूपनलिकांची विद्युत जोडणी तोडण्यात आली नाही. आधी ती तोडण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज मांडण्यात आली. मध्यंतरीही असेच प्रकार करण्यात आल्याने तालुका पंचायतच्या खजिन्यावर वर्षाकाठी 8 कोटींहून अधिक भार पडत होता. विद्युत कनेक्शन जोडूनही त्याचा योग्य उपयोग करण्यात येत नसल्याने 8 कोटींचा भार सोसावा लागत होता. त्यानंतर तातडीने ते बंद करण्यात आले होते. आता 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी ते पाणी पैसे देऊन देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असेल तर ते पाणी नको, असा आवाज उठविण्यात आला.
बेळगाव तालुक्मयातील संगणक उतारे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत असून ग्राम विकास अधिकाऱयांनी तातडीने ते द्यावेत, अशी मागणी यावेळी तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांनी केली. मात्र याला पीडीओंनी विरोध करून जर उतारे हवे असतील तर सरकारकडून तसा आदेश द्यावा. या उताऱयांबाबत तब्बल 20 पीडीओंना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे हे काम करण्यास आपण तयार नसल्याचे सांगण्यात आले.
ग्रामस्थांना नाहक त्रास
याचबरोबर ज्या गावात स्मशानभूमी नाहीत त्या गावात स्मशानभूमीसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. मात्र, मागील तालुका पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीतही यासंबंधी पीडीओ व संबंधित अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, याकडे त्यांनी वारंवार कानाडोळा केला आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा स्मशानभूमीच्या उभारणीसाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
अनेक घरांची कामे प्रलंबित आहेत, ती कामे पूर्ण करण्यासाठी मोठे प्रयत्न होण्याची गरज आहे. मात्र, अजूनही अनेकांनी घरे बांधून घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तेव्हा तातडीने ही घरे बांधून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले. मात्र, निधीच उपलब्ध नसल्याने घरे कशी बांधणार? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
व्यासपीठावर जि. पं. सदस्य सिद्धू सुणगार, ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर, अजाप्पा मळगली, ता. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, तहसीलदार आर. के. कुलकर्णी उपस्थित होते. याबरोबरच संबंधित 30 कार्यालयांतील अधिकारीही उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक तालुका पंचायतचे अधिकारी श्रीधर सरदार यांनी केले.









