ओटीटीवर झळकणार अक्षय कुमारचा चित्रपट
अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा ‘अतरंगी रे’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाद्वारे अक्षय पहिल्यांदाच आनंद एल. राय या दिग्दर्शकासोबत जोडला गेला आहे. रांझना, तनु वेड्स मनु, प्रेंचाइजी आणि झिरो यासारखे चित्रपटांचे दिग्दर्शक आनंद प्रेमकथांना वेगळय़ा प्रकारे सादर करण्यासाठी ओळखले जातात.
अतरंगी रे हा चित्रपट आता चित्रपटगृहांऐवजी थेट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 24 डिसेंबर रोजी हा चित्रपट चाहत्यांना पाहता येईल. थेट ओटीटीवर झळकणारा अक्षयचा हा तिसरा चित्रपट आहे. अक्षयने चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करत प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली. एका प्रेमकहाणीपेक्षा अधिक जादुई काहीच नाही. अतरंगी एक अशीच कहाणी असल्याचे त्याने म्हटले आहे.

एका पोस्टरवर अक्षय, सारा आणि धनुष स्वतःच्या व्यक्तिरेखांमध्ये दिसून येतात. तर दुसऱया पोस्टरमध्ये धनुष आणि सारा यांच्या व्यक्तिरेखा विवाहानंतर छायाचित्रे काढून घेत असल्याचे दिसून येते. या चित्रपटाद्वारे अक्षय, सारा आणि धनुष पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहेत. याचा ट्रेलर देखील बुधवारी प्रदर्शित झाला आहे.









