केंद्रीय अमित शाह यांच्या व्हर्च्युअली उपस्थितीत एनसीबीची कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिल्लीत ‘अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ याविषयावरील क्षेत्रीय संमेलनाचे अध्यक्षत्व केले आहे. या कार्यक्रमात सर्व राज्यांच्या एएनटीएफच्या समन्वयाद्वारे एनसीबीकडून देशाच्या विविध हिस्स्यांमध्ये 1,44,000 किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.
अमली पदार्थांच्या तस्करीत सामील गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम हाती घेतली आहे. यानुसार पंजाबमधील अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अमृतसर येथे स्वत:चे कार्यालय सुरू केले आहे. यावेळी क्षेत्रीय संचालक अमनजीत सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ऑनलाइन बैठक केली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
ऑनलाईन बैठकीत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सामील झाले आणि त्यांनी गृहमंत्र्यांसोबत स्वत:ची भूमिका मांडली आहे. अमली पदार्थांच्या तस्करांना कुठल्याही स्थितीत सोडले जाणार नसल्याचे शाह यांनी म्हटले आहे. हेरॉइन आणि अन्य प्रकारच्या अमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी देशभरात अनेक सुरक्षा यंत्रणा काम करत आहेत. पाकिस्तानातून तस्करीमार्गे येणाऱ्या हेरॉइनची मोठी खेप पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी हस्तगत केली आहे. तसेच अनेक मोठ्या तस्करांना अटक करत तुरुंगात डांबण्यात आले आहे.
राज्यांच्या यंत्रणांकडूनही कारवाई
नष्ट करण्यात आलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) हैदराबाद शाखेकडून जप्त करण्यात आलेले 6,590 किलोग्रॅम, इंदोर शाखेकडून जप्त करण्यात आलेले 822 किलोग्रॅम आणि जम्मू शाखेकडून जप्त करण्यात आलेल्या 356 किलोग्रॅम अमली पदार्थांचा समावेश होता. याचबरोबर राज्यांच्या विविध तपास यंत्रणांनीही जप्त अमली पदार्थ नष्ट केले आहेत. यात मध्यप्रदेशात 1.03 लाख किलोग्रॅम, आसाममध्ये 1,486 किलोग्रॅम, चंदीगडमध्ये 229 किलोग्रॅम, गोव्यात 25 किलोग्रॅम, गुजरातमध्ये 4,277 किलोग्रॅम, हरियाणात 2,458 किलोग्रॅम, जम्मू-काश्मीरमध्ये 4,069 किलोग्रॅम, महाराष्ट्रात 159 किलोग्रॅम, त्रिपुरात 1,803 किलोग्रॅम आणि उत्तरप्रदेशात 4,049 किलोग्रॅम अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.
लक्ष्यापेक्षा 11 पट अधिक प्रमाण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अमली पदार्थमुक्त भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने ड्रग्ज विरोधात झिरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारले आहे. 1 जून 2022 पासून 15 जुलै 2023 पर्यंत एनसीबीच्या सर्व क्षेत्रीय शाखा आणि राज्यांच्या यंत्रणांनी सुमारे 9,580 कोटी रुपयांचे सुमारे 8,76,554 किलोग्रॅम जप्त अमली पदार्थ नष्ट केले आहेत. हे प्रमाण निर्धारित लक्ष्यापेक्षा 11 पट अधिक आहे. तर सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईमुळे एका वर्षात नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थांचे एकूण प्रमाण 10 लाख किलोग्रॅमपर्यंत पोहोचले आहे. या अमली पदार्थांची किंमत सुमारे 12 हजार कोटी रुपये इतकी होती.









