पदवीधर-डिप्लोमाधारकांची धावपळ : 12 जानेवारीपासून अंमलबजावणी
बेळगाव : काँग्रेस सरकारच्या पाचव्या गॅरंटीसाठी म्हणजेच युवा निधीसाठी जिल्ह्यातून आतापर्यंत 2316 लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. पदवीधर युवकांना आर्थिक प्रोत्साहनासाठी सुरू केलेल्या युवा निधीच्या ऑनलाईन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ झाला आहे. सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. त्यापैकी शक्ती, गृहज्योती, गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजनांना प्रारंभ झाला आहे. त्यापाठोपाठ आता युवा निधीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. 26 डिसेंबरपासून या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2316 तरुणांनी अर्ज दाखल केले आहेत. युवा निधीअंतर्गत पदवीधर तरुणांना 3000 रुपये तर डिप्लोमाधारकांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. युवा निधीच्या नोंदणीला प्रारंभ झाला आहे. बेळगाव वन, कर्नाटक वन, ग्राम वन आणि बापुजी सेवा केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात पदवीधर आणि डिप्लोमाधारकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातून युवा निधीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत. पहिल्या आठवड्यात दोन हजार अर्ज दाखल झाले असले तरी आता अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे. या योजनेची अंमलबजावणी 12 जानेवारीपासून होणार आहे. त्यामुळे नववर्षात तरुणांना युवा निधीची रक्कम हातात पडणार आहे.
तांत्रिक अडचणीमुळे गैरसोय…
युवा निधीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे अर्ज भरताना तरुणांना त्रास होऊ लागला आहे. बेळगाव वन, कर्नाटक वनमध्ये सर्व्हरडाऊनच्या समस्या निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे.
राज्यातून 19392 अर्ज दाखल
राज्यातून युवा निधीसाठी 19392 अर्ज दाखल झाले आहेत. तर बेळगाव जिल्ह्यातून 2316 अर्ज आले आहेत. 26 डिसेंबरपासून अर्ज स्वीकृतीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. संबंधित कागदपत्रांसह लाभार्थ्यांनी युवा निधीसाठी अर्ज करावेत.
-चिदानंद बाके (जिल्हा कौशल्य विकास अधिकारी)









