नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गृहयुद्धग्रस्त सुदान देशात अडकलेल्या भारतीयांना मुक्त करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन कावेरी’ या अभियानाचा प्रारंभ केला आहे. मंगळवारी या अभियानाअंतर्गत आणखी 231 नागरीकांची सुटका करण्यात आली. त्यांना प्रथम जेद्दाह येथे स्थानांतरित करण्यात आले आणि नंतर भारतात आणण्यात आले. हे गुजरातचे नागरीक असल्याचे समजते. त्यांना अहमदाबाद येथे आणण्यात आले.
आतापर्यंत या अभियानाअंतर्गत सव्वादोन हजारांहून अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. सुदानमध्ये भारतचे 3 हजारहून अधिक नागरीक अडकलेले होते. तसेच अन्य देशांमध्ये राहणारे भारतीय वंशाचे 1,000 हून अधिक नागरीकही आहेत. त्यांच्या सुटकेचे उत्तरदायित्वही भारताने स्वीकारले आहे.
गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी मंगळवारच्या सुटकेसंबंधी माहिती दिली. गुजरात सरकारच्या वतीने या नागरीकांचे अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर स्वागत करण्यात आले. कावेरी अभियानाअंतर्गत सुदानच्या युद्धग्रस्त खार्टूम आणि इतर भागांमधून प्रथम भारतीय नागरीकांना बसेसमधून बंदरापर्यंत नेले जात आहे. बंदरात आल्यानंतर त्यांना नौकांमधून सौदी अरेबियाचे शहर जेद्दाह येथे आणण्यात येत आहे. त्यानंतर विमानांनी त्यांना भारतात आणण्यात येत आहे. यासाठी विशेष नौका आणि विमाने यांची योजना करण्यात आलेली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये सर्व भारतीयांची सुटका केली जाईल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.









