सातारा :
स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा, चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी असे 23 गंभीर गुन्हे करणारी टोळी जेरबंद केली आहे. या टोळीकडून 52 तोळे वजनाचे 52 लाखांचे सोन्याचे दागिने व गुह्यात वापरलेली मोटर सायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सचिन संत्र्या भोसले (वय 30, रा. फडतरवाडी, ता. सातारा), नदीम धमेंद्र काळे (वय 22, रा. तुजारपूर ता. वाळवा, जि. सांगली) यांना जेरबंद केले आहे. या गुह्यात सोने विकत घेणारे सोनार आशिष चंदुलाल गांधी (वय 39, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव), संतोष जगन्नाथ घाडगे (वय 48, देगाव, ता. सातारा) यांनाही जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षकांनी दिलेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सचिन यंत्र्या भोसले याने त्याच्या साथीदारांसोबत सातारा जिल्ह्यात दरोडा, चेन स्नॅचिंग, घरफोडी असे बरेच गुन्हे केले आहेत. तो त्याच्या साथीदारासह जिहे येथे येत-जात आहे. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व त्यांच्या तपास पथकाने जिहे येथे वेळोवेळी जाऊन त्याठिकाणी सापळा लावून आरोपी सचिन यंत्र्या भोसले व त्याच्या साथीदारांची माहिती काढून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पथकास चकवा देत होता. परंतु तपास पथकाने पाठपुरावा करुन त्या भागात वेषांतर करुन अहोरात्र पेट्रोलिंग करुन व माहिती प्राप्त करुन सोमवार 7 जुलै रोजी जिहे गावात सापळा लावून जिवाची पर्वा न करता त्याच्या मोटार सायकलचा पाठलाग करुन त्यास शिताफीने पकडले.
आरोपी सचिन भोसले याने सातारा जिल्ह्यातील सराफ दुकानदारांना चोरी केलेल्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर तपास पथक सराफांच्याकडे तपास करत असताना सराफ सुवर्णकार समितीचे उमेश बुन्हाडे, प्रथमेश नगरकर (दोघे रा. पुणे), शशिकांत दीक्षित (रा. सातारा) यांनी विविध मार्गाने तपासात अडथळा निर्माण केला. गुन्ह्यातील निष्पन्न सोनारांची दिशाभूल करुन त्यांच्यावर दबाव टाकून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत होऊ नयेत म्हणून प्रयत्न केले. चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारांना अभय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सातारा जिल्हयातील कष्टकरी, गोरगरीब लोकांचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यामध्ये अडथळा निर्माण झाला होता. परंतु तपास पथकाने कौशल्याने तपास करुन विविध गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात हस्तगत केले आहेत.
तपास पथकाने तपासा दरम्यान अटक आरोपी सचिन यंत्र्या भोसले व त्याचे इतर 7 साथीदार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये 1 दरोडा, 8 चेन स्नॅचिंग, 3 जबरी चोरी, 8 घरफोडी चोरी, 3 इतर चोरी असे एकूण 23 गुन्हे केल्याचे निष्पन्न केले. तसेच गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक आरोपीकडून चोरीचे सोने घेणाऱ्या दोन सोनारांना अटक करुन या गुन्ह्यांमधील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 52 तोळे 1 ग्रॅम 530 मिली (अर्धा किलो) वजनाचे सोन्याचे दागिने चालू बाजार भावाप्रमाणे 52 लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली 50 हजार रुपये किमतीची एक मोटार सायकल, गुन्हा करताना वापरलेला कोयता असा एकूण 52 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर पोलीस अंमलदार विश्वनाथ संकपाळ, अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, मुनीर मुल्ला, हसन तडवी, आबा कदम, अजय जाधव, अमित झेंडे, शिवाजी भिसे, मनोज जाधव, प्रवीण कांबळे, स्वप्निल दौंड, प्रवीण पवार, धीरज महाडीक, वैभव सावंत अधिका वीर, पंकज बेसके, दलजित जगदाळे, संभाजी साळुंखे यांनी केली.








