दोघा आंतरराज्य मोटारसायकल चोरांना अटक : सव्वाआठ लाखाच्या दुचाकी जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
दोघा अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करून अंकलगी (ता. गोकाक) पोलिसांनी 8 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 23 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या जोडगोळीने महाराष्ट्रातील कोल्हापूर, करवीर, इचलकरंजी, हातकणंगले येथेही मोटारसायकली चोरल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
कळंबा, जि. कोल्हापूर येथील संतोष रामचंद्र निशाणे, तळगिनहट्टी, ता. गोकाक येथील भरमाप्पा यल्लाप्पा कोप्पद या दोघांना अटक करण्यात आली आहे. अंकलगी व गोकाक परिसरात या जोडगोळीने घरासमोर व रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.
अलीकडे तालुक्यातील विविध गावांत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. कुंदरगी येथील लक्ष्मी मंदिरासमोर 23 ऑगस्ट रोजी दुचाकीची चोरी झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना दोघा आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या जोडगोळीने कोल्हापूर, करवीर, इचलकरंजी, हातकणंगले, बेळगाव, गोकाक, अंकलगी, निपाणी, हुक्केरी, संकेश्वर परिसरातही मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे.









