पुणे / वार्ताहर :
बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाला अज्ञात मोबाईल धारकाने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, पैसे गुंतवल्यानंतर कोणताही प्रतिसाद न देता संबंधिताने तक्रारदाराची 23 लाख 24 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी अज्ञात मोबाईल धारक आणि बँक खातेदाराविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अखिल संधीप्रकाश आगटे (वय 45, रा. खराडी, पुणे) यांनी पोलिसांकडे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. 9 ते 11 एप्रिल 2023 यादरम्यान हा ऑनलाईन प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अखिल आगटे हे व्यावसायिक असून, त्यांना 9 एप्रिल रोजी अज्ञात मोबाईल धारकाने फोन करून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइन ट्रेड करण्यास सांगितले. ट्रेड केलेल्या बिटकॉइनवर सुरुवातीला आरोपींनी तात्काळ नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या बँक खात्यावर एकूण 23 लाख 24 हजार 400 रुपये जमा करून घेतले. मात्र, त्यानंतर कोणताही परतावा आणि मुद्दल परत न देता त्यांची 23 लाख 24 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस रेवले पुढील तपास करत आहेत.








