वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील मिसिसिपी येथे शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात 23 जणांचा मृत्यू झाला. या परिसरात मुसळधार पावसात गोल्फच्या चेंडूंएवढ्या मोठ्या गारा पडल्या आहेत. चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरे-इमारतींमध्ये अनेक लोक गाडले गेल्याची भीती आहे. चक्रीवादळानंतर बहुतांश भागात काळोख पसरला असून हजारो लोकांच्या घरातील वीज गायब झाली आहे. धोकादायक वादळामुळे बरेच लोक जखमी झाले असून काही लोक बेपत्ता असल्याची माहिती आपत्कालीन सेवांकडून देण्यात आली. या आपत्तीतील मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीतीही वर्तवली जात आहे. चक्रीवादळाचा वेग प्रचंड असल्यामुळे झाडे-घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बाधित भागात बचावकार्य सुरू असल्याचे मिसिसिपीचे महापौर टेट रीव्हस यांनी सांगितले. मिसिसिपीच्या रोलिंग फोर्क शहरात सर्वात जास्त विध्वंस झाला आहे.









