अद्यापही बरेच विद्यार्थी बसपासच्या प्रतीक्षेत : प्रक्रियेला गती देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
यंदा शैक्षणिक वर्षाला उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे बसपास प्रक्रियेला उशिरानेच प्रारंभ झाला आहे. परिवहनकडून आतापर्यंत 23 हजार विद्यार्थ्यांना बसपास वितरित करण्यात आले आहेत. गतवर्षापासून बसपासची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसपास मिळविताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसपास प्रक्रियेला सुरुवात होऊन दीड महिना उलटला तरी केवळ 23 हजार विद्यार्थ्यांनीच बसपास मिळविले आहेत. बसपास प्रक्रिया किचकट आणि वेळकाढू असल्याने विद्यार्थी बसपास मिळविण्यासाठी निरुत्साही असल्याचे दिसत आहे.
बसपास काढणेच लाभदायक
ऑगस्ट अखेरपासून महाविद्यालयांना प्रारंभ झाला. दरम्यान, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने जुन्या पासची मुदत वाढवून दिली होती. 26 सप्टेंबरला जुन्या पासची मुदत संपल्यानंतर काही विद्यार्थ्यांचा तिकीट काढूनच प्रवास सुरू आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. शैक्षणिक वर्षातील चार महिने शिल्लक राहिल्याने काही विद्यार्थी बसपास काढण्यासाठी निरुत्साही असल्याचे दिसत आहे. मात्र दैनंदिन तिकिटाचा खर्च अधिक आहे. त्यामुळे बसपास काढणेच विद्यार्थ्यांना लाभदायक ठरू शकते.
गतवर्षापासून बसपास प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. विद्यार्थ्यांना बसपास मिळवायचा असल्यास सेवासिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केलेली पावती संबंधित शाळा-कॉलेजमध्ये जमा करणे गरजेचे आहे. शाळा-कॉलेजमधून जमा झालेले अर्ज बसपास विभागात देणे आवश्यक आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून बसपास विभागातून पासचे वितरण केले जात आहे.









