नवी दिल्ली / प्रतिनिधी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून प्रजासत्ताक दिनाची सुरुवात होणार असल्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 23 जानेवारीला जयंती असते. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाची सुरुवात आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीला होणार आहे.
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये झाला होता. इतिहास आणि संस्कृतीच्या महत्त्वाच्या घटनांवर कार्यक्रम साजरे करण्यावर भर देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला होता.
14 ऑगस्टला स्मरण दिवस, 31 ऑक्टोंबरला राष्ट्रीय एकता दिवस तसेच 15 नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिवस, 26 नोव्हेंबरला संविधान दिवस आणि वीर बाल दिवस साजरा करणाचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून त्यात आता सुभाषचंद्र बोस यांची जयंती प्रजासत्ताक दिनाच्या समारोहात साजरी होणार आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याशी संबंधीत स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने योजना आखली असून गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये, 21 ऑक्टोबर 1943 रोजी बोस यांनी जाहीर केलेल्या तात्पुरत्या सरकारच्या स्थापनेच्या वर्धापन दिन साजरा केला गेला. या निमित्त पर्यटन मंत्रालय कार्यक्रमांचा भाग म्हणूनचे नियोजन केले होते.