मुले आणि शिक्षकांच्या वाढत्या मृत्यूंमुळे सारेच धास्तावले आहेत. म्हणून विद्यागम योजना स्थगित करण्यात आली आहे. दसऱयानंतरही शाळा-कॉलेज सुरू होतील, याची शाश्वती नाही. कारण कोरोना महामारीचा फैलाव वाढतो आहे.
15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी शिक्षणतज्ञ व लोकप्रतिनिधींची मते मागविली होती. यासंबंधी चर्चा सुरू असतानाच शाळकरी मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार वाढले आहेत. शिक्षक व विद्यार्थी कोरोनाचे बळी ठरत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून शैक्षणिक उपक्रम ठप्प आहेत. के. जी. पासून पी. जी. पर्यंतचे अभ्यासक्रम रडतखडत सुरू आहेत. शहरी भागात ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. खासगी शिकवण्या देणाऱया शिक्षकांनीही ऑनलाईनवरच भर दिला आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ‘चंदन’ या सरकारी दूरदर्शन वाहिनीवर विद्यार्थ्यांना धडे देण्याचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. कर्नाटकातील सद्यस्थिती लक्षात घेता शाळा, महाविद्यालये सुरू झाली की परिस्थिती हाताबाहेर जाणार याची सर्व लक्षणे दिसून येत आहेत. आरोग्य मंत्री बी. श्रीरामलू यांच्याकडील आरोग्यमंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. सुधाकर यांच्याकडे आरोग्य मंत्रीपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या श्रीरामलू हे नाराज आहेत.
ऑनलाईन शिक्षण सगळय़ांना शक्मय आहे, असे नाही. अनेकांकडे आजही स्मार्ट फोन नाहीत. अशा परिस्थितीत गोरगरीबांची मुले ऑनलाईन शिक्षण कसे घेणार याचा विचार करून कर्नाटकात ‘विद्यागम’ ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील 49 लाख 34 हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी 2 लाख शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, बेळगाव, गुलबर्गा, हावेरी आदी जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यागम उपक्रम सुरू झाल्यानंतर बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे साहजिकच राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत शिक्षण खात्याच्या अखत्यारित काम करणाऱया 225 हून अधिक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अफझलपूर (जि. गुलबर्गा) तालुक्मयातील माशाळ या गावात सहा विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव जिल्हय़ातील रामदुर्ग तालुक्मयातील एम. तिम्मापूर या गावातील 30 विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हावेरी जिल्हय़ातही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
विद्यागम हा उपक्रम सुरू झाल्यानंतर 641 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 46 जण दगावले आहेत. गेल्या सहा महिन्यात 2 हजारहून अधिक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्नाटकातील साडेचारशेहून अधिक शाळकरी मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. एका हावेरी जिल्हय़ात 204 हून अधिक मुले बाधित झाली आहेत तर एका बेळगाव जिल्हय़ात सहा महिन्यात 57 शिक्षकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. ही आकडेवारी पालकांची भीती वाढवणारी आहे. जे होऊ नये म्हणून आजवर शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आली होती ते घडू लागले आहे. पूर्ण वेळ शाळा-कॉलेज सुरू न करता मर्यादित वेळेत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे. खासकरून ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सुरू केलेला उपक्रम जीवघेणा ठरू लागला आहे. 2020-21 शैक्षणिक वर्ष परीक्षाविरहित वर्ष म्हणून घोषित करा, अशी शिफारस बालहक्क आयोगानेही केली आहे. विद्यार्थ्यांमुळे शिक्षकांना लागण झाली की शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांना? यापेक्षा शाळकरी मुलांमध्ये कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने वाढतो आहे, हे या प्रकारामुळे अधोरेखित झाले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आदींनी विद्यागम उपक्रम त्वरित स्थगित करण्याची मागणी केली होती. कारण विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते. सुरुवातीला चांगली योजना स्थगित का करायची या भूमिकेत राज्य सरकार होते. रविवारपर्यंतची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी हा उपक्रम स्थगित करण्याबरोबरच शाळा-कॉलेजना तीन आठवडय़ांची सुटी जाहीर केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शाळा-कॉलेज बंद आहेत. त्यामुळे यंदा दसरा सुटी मिळणार नाही, असे सांगितले गेले. मात्र, बदलत्या परिस्थितीमुळे राज्य सरकारने तीन आठवडय़ांची सुटी जाहीर केली आहे. शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांना सध्या कोरोनाची लागण झाली आहे. तरीही शैक्षणिक उपक्रम व या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडींवर ते लक्ष ठेवून आहेत. आपण केवळ शिक्षणमंत्री नाही तर 1 कोटी मुलांचा काळजीवाहक आहे या भूमिकेतून आपण विचार करतो, असे सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. आता 30 ऑक्टोबरपर्यंत शाळा-कॉलेज उघडणार नाहीत. शाळांना सुटी असली तरी शिक्षकांना हजेरीची सक्ती होती. आता शिक्षकांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे.
विद्यागम योजना सुरू करण्यामागे सरकारचा हेतू चांगला होता. शाळेत वर्ग भरविण्याऐवजी एखाद्या मंदिरात, एखाद्या झाडाखाली, एखाद्या पडवीवर सात-आठ मुलांना बोलावून सरकारी नियम पाळून त्यांना शिक्षण देण्याची ही योजना. ज्यांच्याजवळ अँड्रॉईड मोबाईल नाहीत, ज्यांना ऑनलाईन क्लासची सुविधा नाही, अशा विद्यार्थ्यांबरोबर हितगुज करीत त्यांच्या कलानुसार त्यांना शिक्षण देण्याचा हा उपक्रम होता. हा उपक्रम राबविला गेला नाही तर मुले पूर्णपणे शाळा व शैक्षणिक उपक्रमापासून महिनो न् महिने अलिप्त राहणार. त्यामुळे अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागणार. बालमजुरी, बालविवाह आदी प्रकार वाढणार ही भीती मनात बाळगून विद्यागम योजना सुरू झाली होती.
तीन महिन्यांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात झाली होती. आपल्या मनातील शंका शिक्षकांना भेटून दूर करून घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुकूल होईल. ज्यांच्याजवळ सोयीसुविधा आहेत, ते ऑनलाईनच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमात सहभागी आहेत. जे या उपक्रमापासून वंचित आहेत, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत होता. काही ठिकाणी तर कोरोनाचा फैलाव वाढेल या भीतीने पालक आपल्या मुलांना शाळेला पाठवत नव्हते. ज्यांनी पाठवले आहे त्यांच्या मुलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पालक धास्तावले आहेत. शिक्षकांच्या वाढत्या मृत्यूंमुळे शिक्षकही धास्तावले आहेत. म्हणून विद्यागम योजना स्थगित करण्यात आली आहे. दसऱयानंतरही शाळा-कॉलेज सुरू होतील, याची शाश्वती नाही. कारण कोरोना महामारीचा फैलाव वाढतो आहे. विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी अनलॉक-5 मध्ये केंद्र सरकारने सर्व काही खुले केले आहे. याचा अर्थ कोरोना कमी झाला आहे, असा होत नाही. याचे गांभीर्य हरवल्यानेच फैलावही वाढतो आहे.
रमेश हिरेमठ








