मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती : सर्वच मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांचे दौरे करण्याचेही आदेश
प्रतिनिधी,/ मुंबई / पुणे
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. यावर राज्य सरकारकडून 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2,215 कोटी ऊपयांची मदत करण्यासाठीचा शासन निर्णय झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. तसेच यापैकी 1829 कोटी ऊपये संबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई जमा होण्यास सुऊवात झाली आहे. येत्या आठ-दहा दिवसांमध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असेही त्यांनी सांगितले आहे.
पंचनाम्याचे आदेश
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. सगळे पंचनामे झाल्यावर एकत्रित मदत करण्याऐवजी जसे पंचनामे होतील, तशी तातडीने मदत करण्याचे धोरण राज्य सरकारने अवलंबिले आहे.
70 लाख एकरच्या वर शेतीचे नुकसान
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यभरात 70 लाख एकरच्या वर आतापर्यंत नुकसान झाले आहे. यासाठी 2100 कोटी ऊपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अतिवफष्टीत नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले. सर्व मंत्र्यांना बुधवारपासून नुकसानग्रस्त भागांचे दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक बुधवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून ते तेथील पूरपरिस्थितीचा आढावा घेतील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वऊपी मदत द्या : शरद पवार
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ तातडीची व तात्पुरती मदत देऊन भागणार नाही, तर त्याला कायमस्वरूपी मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करावे लागेल. बळीराजा वाचला नाही, तर राज्यावर मोठे संकट ओढवेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व नुकसानीवर चिंता व्यक्त करतानाच राज्यात जाणीवपूर्वक मराठा विऊद्ध ओबीसी वाद निर्माण केला जात असल्याचे ताशेरेही त्यांनी ओढले.
गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात बोलताना पवार यांनी या प्रश्नाची भीषणता मांडली. ते म्हणाले, की या नैसर्गिक आपत्तीत केवळ पिकेच नव्हे, तर गुरे-ढोरे आणि शेतजमीनसुद्धा वाहून गेली आहे. पीक वाहून गेल्यास शेतकऱ्याचे एका वर्षाचे नुकसान होते, पण जमीन वाहून गेल्यास त्याच्या उत्पादनाचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे सरकारने केवळ पिकांच्या नुकसानीचा विचार न करता वाहून गेलेल्या जमिनीसाठीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पंचनामे प्रत्यक्ष शेतावर जाऊन करायला हवेत आणि ही प्रक्रिया शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पार पाडावी, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसह त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी कायमस्वरूपी मदतही करावी लागेल. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राच्या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी. विभागाने यंदा मे महिन्यापासूनच अतिवृष्टीचे अचूक अंदाज दिले होते, त्याची नोंद सरकारने घ्यायला हवी होती, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. काही मंत्री प्रत्यक्ष पाहणी करत असल्याची बाब चांगली असली तरी आता मुख्य लक्ष ‘शेतकरी राजा पुन्हा कसा उभा राहील’ यावर केंद्रीत करण्याची गरज असल्याचे पवार यांनी नमूद केले.
तातडीने आर्थिक मदत बँक खात्यात जमा करा : उध्दव ठाकरे
मराठवाड्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थीतीबाबत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ न घालवता तातडीने आर्थिक मदत बँक खात्यात जमा करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. किमान 10,000 कोटींची मदत तात्काळ जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्याच्या बँक खात्यांमध्ये नुकसानीचे पैसे तात्काळ जमा करावेत. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये, यासाठी निर्देश देण्याची मागणीही त्यांनी केली.
मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पाऊस
बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सोमवारपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तरपूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याशिवाय पूर्व मध्य बंगाल आणि लगतच्या उपसागरात 25 सप्टेंबरला आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले असून, मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी सोमवारी पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण, पावसाची रिपरिप अनेक ठिकाणी सुरूच होती. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रात 24 सप्टेंबर (बुधवार) वगळता पुढील सात दिवस, कोकणात 25 ते 28, मराठवाड्यात 23, 26 आणि 27 सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस होणार आहे. यात 26 ते 28 दरम्यान पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टी
सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात सरासरीच्या 34 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. यात कोकणात सरासरीच्या 22, मध्य महाराष्ट्र 24 आणि विदर्भात 37 टक्के अधिकचा पाऊस झाला. मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी असून, सरासरीच्या 65 टक्के अधिकचा पाऊस या भागात बरसला आहे.
विदर्भ, मराठवाड्यात धो-धो पाऊस
विदर्भ, मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले असून, अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. यात वर्धा, यवतमाळ, नांदेड, वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभानीनगर तसेच सोलापूर. धाराशिव, पालघर, नंदुरबार आदी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांनी महिन्याच्या पावसाची सरासरी आधीच ओलांडली आहे. या भागात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्याने आता यात आणखी भर पडणार आहे.








