पालकमंत्री सतीश जारकीहोळी : नव्या विद्युत स्टेशनच्या कामाचे भूमीपूजन
बेळगाव : राज्यात बेळगाव शहराचा विकास वेगाने होत आहे. शहरात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. उद्यमबाग व परिसरातील औद्योगिक वसाहतीला नियमित वीजपुरवठा व्हावा, या उद्देशाने मच्छे येथे 220 केव्ही विद्युत स्टेशन उभारले जात आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. मच्छे येथील 220 केव्ही विद्युत केंद्राच्या भूमीपूजनावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील व इतर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून शहराच्या दक्षिण भागात 220 केव्ही स्टेशन उभारण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर 250 कोटी रुपये खर्च करून हायटेक असे विद्युत स्टेशन उभारले जाणार आहे. यासाठी 18 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यामुळे उद्योगक्षेत्राला चांगल्या दर्जाचा वीजपुरवठा होईल, असे त्यांनी सांगितले. व्हीटीयुसमोरील हेस्कॉम उपकेंद्रात हे नवीन स्टेशन उभारले जाणार आहे. सध्या शहरामध्ये एकच 220 केव्ही स्टेशन असल्यामुळे विजेच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे नवीन विद्युत स्टेशन शहरासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे केपीटीसीएलच्या अधिकाऱ्याने सांगितले.









