बेपत्ता 17 जवानांचे मृतदेह सापडले जखमी 31 जवानांवर इस्पितळात उपचार
विजापूर / वृत्तसंस्था
छत्तिसगडमधील विजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेल्या जवानांचे मृतदेह हाती लागल्यानंतर मोठय़ा घातपाती कारवाईचा उलगडा झाला. रविवारी सकाळी सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान जवानांचे 17 मृतदेह हाती लागल्यानंतर आतापर्यंत या भीषण चकमकीत 22 सुरक्षा कर्मचारी हुतात्मा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षातील सर्वात मोठय़ा संघर्षामुळे देश हादरला असून केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचा प्रचारदौरा अर्धवट सोडत दिल्लीत परतण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान-राष्ट्रपतींनीही या घटनेप्रति शोक व्यक्त केला आहे.
विजापूर जिल्हय़ातील ताररेम येथे शनिवारी दुपारच्या सुमारास नक्षलवादी आणि सीआरपीएफ जवानांमध्ये चकमक उडाली. या चकमकीमध्ये पाच जवान हुतात्मा आणि दहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती शनिवारी रात्रीपर्यंत उपलब्ध झाली होती. विजापूर जिल्हय़ात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेमध्ये एसटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा पथकाचे जवान सहभागी झाले होते. नक्षलवाद्यांचा म्होरक्या हिडमा याचा शोध घेण्यासाठी हाती घेण्यात आलेली ही व्यापक मोहीम सुरक्षा दलाच्या दृष्टीने घातक ठरली आहे. दरम्यान, मृत जवानांकडील शस्त्रास्त्र आणि दारुगोळय़ाची नक्षलवाद्यांनी लूट केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
सकाळपासूनच बेपत्तांची शोधमोहीम
सुरक्षा दलातील बेपत्ता झालेल्या झालेल्या कर्मचाऱयांचा शोध घेण्यासाठी जंगलभागात चकमक झालेल्या भागात शोधपथके पाठवण्यात आली होती. या पथकांना रविवारी त्यांचे मृतदेह सापडले, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली. दरम्यान, बेपत्ता झालेल्या जवानांपैकी 17 जणांचे मृतदेह सुरक्षा दलांना रविवारी मिळाले. दरम्यान अजूनही 15 जवान बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पाच जवान यात हुतात्मा झाले होते. तर 31 जवान जखमी झाले आहेत. अजूनही काही जवान बेपत्ता झाल्याचे बोलले जात असले तरी सुरक्षा दल किंवा गृह मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. गंभीर जखमी असलेल्या काही जवानांना हेलिकॉप्टरमधून थेट रायपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
सीआरपीएफ महासंचालक छत्तिसगडमध्ये दाखल
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीपसिंग हे छत्तिसगडला पोहोचले असून त्यांनी बेपत्ता जवानांमध्ये सात जण केंद्रीय राखीव पोलीस दलातील असल्याचे मान्य केले आहे. अन्य बेपत्ता कर्मचाऱयांमध्ये राज्याच्या जिल्हा राखीव दल आणि विशेष पोलीस दलाच्या कर्मचाऱयांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस दलातील एका ज्ये÷ अधिकाऱयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
‘हिडमा’च्या शोधार्थ मोहीम
रायपूर येथील अधिकाऱयांनी सांगितले की, विजापुरातील ताररेम भागातील गावात नक्षलवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर खात्याकडून मिळाल्यानंतर त्या भागात 400 पोलीस पाठवण्यात आले. नक्षलवाद्यांचा म्होरक्या हिडमा हासुद्धा या भागात असण्याची शक्यता होती. हा भाग राज्याची राजधानी रायपूरपासून 400 किमी दूर आहे. सुरक्षा दलाचे जवान तेथे पोहोचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर चकमक उडाली. सुमारे तीन तास ही चकमक सुरू होती. जंगलातून सुरक्षा दले मागे घ्यावीत आणि त्यासाठी मोठय़ा संख्येने जीवितहानी घडवायची या दुहेरी हेतूने हा हल्ला घडवण्यात आला असावा, असा होरा व्यक्त केला जात आहे.
‘हिडमा’च हल्ल्याचा सूत्रधार
पिपल्स लिबरेशन गेरीला आर्मीचा कमांडर हिडमा याच्या नेतृत्वाखाली हा हल्ला करण्यात आला असल्याचे मानण्यात येते. या भागात तेकुलगुडेम गावाच्या परिसरात नक्षलींचा कमांडर आला आहे, याची पक्की खबर आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही शोधमोहीम राबवण्यास सुरवात केली, असे छत्तिसगडचे पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी सांगितले. 2013 नंतर या भागात हिडमा याचे वर्चस्व असून यापूर्वी त्याने अनेक हल्ले केलेले आहेत. सुरक्षा दलाबरोबरच राजकीय नेत्यांना त्याने बऱयाचदा लक्ष्य बनवले आहे. नक्षलवादग्रस्त बस्तर विभागात गेल्या दहा दिवसांत हा झालेला दुसरा मोठा हल्ला होता. त्यात पाच जण ठार झाले होते. तर 12 जण जखमी झाले होते.
नक्षलवाद्यांचीही मोठी जीवितहानी
शनिवारी झालेल्या चकमकीमध्ये नक्षलवाद्यांचीही मोठी प्राणहानी झाल्याचा दावा केला जात आहे. चकमक झालेल्या जंगलभागातून नक्षलींनी 4 ट्रक्टरमधून मृतदेह भरून नेले आहेत. सीआरपीएफ महासंचालक कुलदीपसिंग यांनीही याला दुजोरा दिला असून नक्षलवाद्यांनी त्यांच्या मृत आणि जखमी साथीदारांना तीन ट्रक्टरमधून नेले. त्यामुळे त्यांची जीवितहानी किती झाली असेल, याची आपण कल्पना करू शकता, असे म्हटले आहे. या चकमकीत ठार झालेल्या एका महिला नक्षलवादीकडे इन्सास रायफल सापडली असून ती कमांडर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
……….
जवळपास 400 नक्षलींनी
तिन्ही बाजूंनी चढवला हल्ला
नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे ः मशिनगन, ग्रेनेड लाँचर, देशी रॉकेटचा वापर
या चकमकीत बचावलेल्या एका अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 400 सशस्त्र नक्षलवाद्यांनी जवानांच्या शोधपथकावर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला करण्यासाठी लाईट मशिनगन्स आणि अंडर बॅरेल ग्रेनेड लाँचर आणि देशी रॉकेटचा वापर केल्याची माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱयांनी दिली. या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या काही कर्मचाऱयांनी घटनास्थळावरील इत्यंभूत माहिती दिली आहे. तसेच शोधमोहिमेवेळी सुरक्षा दलाला शस्त्रसाठाही आढळला आहे.
फोर्स कमांडरने दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी एलएमजी लपवून ठेवत त्यातून गोळीबार करण्यात आला. गोळीबार होत असताना नक्षलवादी अन्यत्र सुरक्षित ठिकाणी लपून बसले होते. युबीजीएल आणि देशी रॉकेटचा वापर यापूर्वीही करण्यात आला होता. मात्र यंदा त्याची तीव्रता अधिक व्यापक होती असे सांगत ‘आमचे जवान शूरपणे लढले’ अशी माहिती सीआरपीएफ महासंचालक कुलदीपसिंग यांनी दिली.
एका ज्ये÷ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी सुरुवातीला तोफगोळे आणि गोळय़ांचा मारा केला. त्यात आमचे काही कर्मचारी जखमी झाले होते. त्यावेळी पोझिशन घेत आमचे सहकारी त्यांना सुरक्षितस्थळी नेत असताना त्यांच्यावर लाईट मशिनगनमधून गोळीबार करण्यात आला. त्यात डीआरजी आणि कोब्राच्या जवानांची मोठय़ा संख्येने हानी झाली, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका अधिकाऱयाने सांगितले.
केंद्र सरकारकडून गंभीर दखल
गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
या घटनेची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून नक्षलवादी संघटनांना योग्य संधी साधून अद्दल घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ट्?िवट करत ‘हुतात्मा झालेल्या जवानांचे बलिदान देश विसणार नाही’ असे म्हटले आहे. त्यांनी सुरक्षा दलाच्या अधिकाऱयांची तातडीची बैठकही बोलावली असून लवकरच नक्षलविरोधी मोहीम अधिक जोरकसपणे राबविण्याचे संकेत दिले आहेत.
गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, गुप्तचर विभाग संचालक अरविंद कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि गृह मंत्रालय व सीआरपीएफ दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या दोन दिवसात घडलेल्या चकमकीसंबंधीच्या सर्व घडामोडींचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच पुढील कारवाईबाबतचे नियोजनही करण्यात आले. मात्र, या बैठकीतील सविस्तर चर्चेबाबत गोपनीयता पाळण्यात आली असून अधिक माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
अमित शहा यांनी छत्तिसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीवर गंभीरपणे लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही राज्यातील वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱयांसोबत तातडीची बैठक घेत नक्षलग्रस्त भागातील सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच सुरक्षा यंत्रणांसाठी सतर्कतेचे आदेश जारी केले.
पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला असून या जवानांचे बलिदान कधीच विसरता येणार नाही असे ट्विट केले आहे. ‘छत्तीसगढमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. वीर जवानांचे हे बलिदान कधीही विसरता येणार नाही’, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.










