अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आतापासून सभागृहात राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीत उल्लेख असलेल्या भाषांमध्ये कामकाजाचा अनुवाद होणार असल्याचे मंगळवारी सांगितले आहे. सभागृहात राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचीत नमूद सर्व भाषांमध्ये अनुवादाची सुविधा उपलब्ध करविण्यात येत असल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे. आतापर्यंत सभागृहाच्या कामकाजाचा अनुवाद हिंदी आणि इंग्रजीसमवेत अतिरिक्त 18 भाषांमध्ये म्हणजेच आसामी, बांग्ला, बोडो, डोगरी, गुजराती, कन्नड, मैथिली, मल्याळी, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दूमध्ये करण्यात येत होता. आता या भाषांमध्ये काश्मिरी, कोंकणी आणि संथाली भाषेला सामील करण्यात आल्याने आम्ही राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचीत नमूद सर्व भाषांमध्ये अनुवादाची सुविधा उपलब्ध करवित आहोत असे बिर्ला यांनी सांगितले आहे.
जगात केवळ भारताची संसद आहे, ज्यात एकाचवेळी 22 भाषांमध्ये अनुवादाची सुविधा उपलब्ध आहे. अशाप्रकारची सुविधा अन्यत्र कुठेच नाही. देशाची लोकशाही आणि राज्यघटनेवर आम्हाला गर्व असायला हवा. याचमुळे सभागृहाचे कामकाज चालविण्यास सहकार्य करण्याचे आवाहन मी खासदारांना करतआहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आमची असून खासदार सभागृहाचे कामकाज चालविण्यास सहकार्य करतील अशी आशा असल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारीही गोंधळ दिसून आला आहे.









