वाहन चालकांचे बजेट कोलमडले : सलग सोळा दिवस नॉनस्टॉप किमती वाढत्याच : जिल्हय़ात प्रतिदिन होणारी पेट्रोल विक्री : साडेतीन लाख लीटरवरून लाखावर
स्वप्नील वरवडेकर / कणकवली:
एकीकडे ‘लॉकडाऊन’मुळे जिल्हय़ातील बहुतांश क्षेत्रांतील नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशातच इंधनाची सातत्याने होत असणारी दरवाढ नागरिकांसाठी जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती सलग 16 दिवस वाढतच चालल्या आहेत. परिणामी ही ‘नॉनस्टॉप’ दरवाढ नागरिकांच्या बिघडलेल्या वैयक्तिक अर्थव्यवस्थेत आणखीनच भर टाकत आहे.
वागदे (ता. कणकवली) येथील हिंदुस्थान पेट्रोलियम या पेट्रोलपंपावरून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 1 ते 22 जून या कालावधीत प्रतिलिटर पेट्रोल 9.97 रुपये, तर डिझेल 10.79 रुपयांनी वाढले आहे. येथील आकडेवारीनुसार 31 मे रोजी पेट्रोल 77.41 रुपये, तर डिझेल 66.30 रुपये प्रतिलिटर होते. मात्र, जूनच्या पहिल्याच दिवशी दरवाढ होऊन पेट्रोल 79.43 रुपये, तर डिझेल 68.87 रुपये झाले. 2 ते 6 जून या कालावधीत हा ‘रेट’ स्थिर होता. मात्र, 7 जूनपासून दरवाढ सुरू झाली, ती अद्याप सुरूच आहे. सोमवार, 22 जूनच्या आकडेवारीनुसार पेट्रोल 87.38, तर डिझेल 77.09 रुपये प्रतिलिटर होते.
कोलमडलेल्या ‘बजेट’मध्ये भर
एकीकडे ‘लॉकडाऊन’मुळे जिल्हय़ातील बाजारपेठा, बहुतांश कार्यालये बंद असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित वाहतूक कित्येक दिवस बंदच होती. या काळात इंधनाचा दर तसा स्थिर होता. पण, ‘लॉकडाऊन’मुळे वाहनचालकांना या स्थिर दराचा म्हणावा तसा लाभ घेता आला नव्हता. दरम्यान, ‘लॉकडाऊन’च्या नियम शिथिलतेनंतर कित्येक दिवस शांत झालेल्या रस्त्यांवर आता हळूहळू वर्दळ वाढतेय. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या व्यावसायिक कामांना आता साधारण वेग प्राप्त होऊ लागलाय. अर्थातच या वेगाला ‘कोरोना’च्या मर्यादा अद्यापही आहेतच. अशा स्थितीतच इंधनाचे दर वाढल्याने नागरिकांच्या आधीच कोलमडलेल्या ‘बजेट’मध्ये आणखीनच भर पडत आहे.
दरवाढीचे कोडे उलगडेना
रत्नागिरी-सिंधुदुर्ग पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भाट सांगतात, पेट्रोल-डिझेल दरवाढीचे आम्हालाही कोडे पडले आहे. सरकार आणि ‘ऑईल’च्या कंपन्या कुठल्या ‘बेस’वर दरवाढ करताहेत, हेच उमगत नाही. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवरील ‘लॉकडाऊन’मुळे पेट्रोलच्या खपावर परिणाम झाला, तो भरून काढण्यासाठी ही दरवाढ होत असावी, असा अंदाज वाहनचालक व्यक्त करत असले, तरी दरवाढीचे ‘कन्फर्म’ कारण आम्हालाही समजलेले नाही. सरकार आणि ऑईल कंपन्यांची नेमकी काय ‘पॉलिसी’ आहे, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. याबाबत ऑईल कंपन्यांनीही आमच्याशी संपर्क साधला नसल्याचे भाट म्हणाले. दरम्यान, जिल्हय़ात दिवसाला सुमारे साडेतीन लाख लिटर पेट्रोलची विक्री होते. मात्र, ‘लॉकडाऊन’मुळे ही विक्री लाखावर आली होती, असेही भाट म्हणाले.
नागरिकांमधून नाराजी
‘कोरोना’चे संकट व त्यामुळे वाटय़ाला आलेले ‘लॉकडाऊन’, परिणामी आर्थिक समस्येच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना आता दैनंदिन व्यवहार बऱयापैकी सुरळीत झाल्याने काहीसा दिलासा मिळत होता. अशा स्थितीतच रोजच्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने याबाबत लवकरच योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वागदे येथील एचपी पेट्रोलपंपावरील आकडेवारी
तारीख पेट्रोल प्रतिलिटर रुपये डिझेल प्रतिलिटर रुपये
31 मे 77.41 66.30
1 जून 79.43 68.30
7 जून 80.01 68.87
8 जून 80.57 69.41
9 जून 81.09 69.95
10 जून 81.47 70.37
11 जून 82.05 70.93
12 जून 82.59 71.47
13 जून 83.16 72.01
14 जून 83.75 72.61
15 जून 84.21 73.16
16 जून 84.67 73.69
17 जून 85.19 74.25
18 जून 85.70 74.84
19 जून 86.24 75.43
20 जून 86.73 75.99
21 जून 87.06 76.55
22 जून 87.38 79.09









