कबरीभोवतीचे अतिक्रमण जमीनदोस्त
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखानाचा दर्गा व त्या परिसरातील संपुर्ण विनापरवाना बांधकाम अखेर ऐतिहासिक सलग 22 तासांच्या मोहिमेव्दारे उद्ध्वस्त करण्यात आले. यासाठी 284 मजुर, 4 जेसीबी, 2 पोकलेन 2 मोठय़ा क्रेन, 9 ट्रक्टॅर व 3 ट्रक यांच्या मदतीने किल्ले प्रतापगडावरील मोहीम सातारा जिल्हा प्रशासनाने फत्ते केली. आता त्या ठिकाणी केवळ जमिनीवर अफझल खान व सय्यद बंडा यांची थडगे फक्त शिल्लक राहिले आहे. सध्या त्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त असला तरी सर्वसामान्यांना त्या भागातील प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.
गुरूवारी पहाटे चार वाजता अतिक्रमण पाडण्यास सुरुवात झाली. या अतिक्रमण हटाव मोहिमेत पाच जिल्हय़ातील पोलीस वन व महसुल विभागाचे कर्मचारी सहभागी झाली होते. कडाक्याच्या थंडीत किल्ले प्रतापगडास पोलिसांनी वेढा घातला होता. एक ही रस्ता अथवा पायवाट पोलीस बंदोबस्तातून सुटली नाही आणि 22 तासांच्या अथक परिश्रमानंतर गनिमांनी उभे केलेले इमले उद्ध्वस्त करून मोहीम फत्ते झाली.
सध्या किल्ले प्रतापगडावर जमावबंदी आदेश असुन प्रतापगडाचे रहिवासी वगळता कोणालाही गडावर प्रवेश दिला जात नाही. संपुर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर आता त्या ठिकणी केवळ दोन थडगी दिसत आहे. त्या दोन्ही थडग्यावर चादरी असून दोन्ही थडग्याभोवती प्लास्टीकची जाळी बांधण्यात आली आहे. या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कबर खुली करा-उदयनराजे
सातारा ः अफझल खानाच्या कबरीलगत असलेले अतिक्रमण प्रशासनाने कायद्याच्या आधारावर काढले आहे. कोणीही त्याचे राजकारण करु नये. तरुणांना इतिहास समजावा यासाठी शासनाने अफझल खानाची कबर खुली करावी, अशी स्पष्ट भूमिका खासदार उदयनराजे यांनी मीडियाकडे व्यक्त केली. दरम्यान, त्यांनी इंग्लडमध्ये असलेली भवानी तलवारही ब्रिटीश सरकारने भारत सरकारकडे सोपवावी, असेही त्यांनी सांगितले. या कारवाईला राजकीय वळण देवू नका. लोकांना आणि पुढील तरुण पिढीला हा इतिहास कळावा यासाठी कबर सर्वासामान्यांसाठी खुली करण्यात यावी, यासाठी राज्य सरकारने विचार करावा.
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लंडच्या सरकारकडे त्यांच्या संग्रहालयात आहे. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारी आणि भारताचा तसेच महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. यामुळे जनभावना लक्षात घेवून ही तलवार मोठय़ा मनाने ब्रिटीश सरकारने भारताकडे सोपवली पाहिजे, असेही उदयनराजे म्हणाले.








