‘ऑपरेशन अजय’मधील पहिले विमान दाखल : प्रवाशांनी पंतप्रधानांना दिले धन्यवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. युद्धात अनेक देशांचे नागरिक मरण पावले आहेत. या चिंतेत भारत सरकारने इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांच्या परतीसाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. या मोहिमेंतर्गत 212 भारतीयांना घेऊन पहिले विमान शुक्रवारी सकाळी तेल अवीवहून नवी दिल्लीला पोहोचले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी विमानतळावर सर्वांचे स्वागत केले.

इस्रायलमध्ये 18 हजारांहून अधिक भारतीय राहतात. त्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून तिला ‘ऑपरेशन अजय’ असे नाव देण्यात आले आहे. दिल्लीतून विशेष विमान पाठवून इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचविण्यासाठी सरकारने व्यापक प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या विमानाने नवी दिल्लीला परतलेल्या 212 भारतीयांपैकी बहुतांश विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने इस्रायलला गेले होते. नवी दिल्लीत पोहोचलेल्या भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ‘मला भारतात परतताना आनंद होत आहे. इस्रायलमध्ये अतिशय भीतीदायक परिस्थिती आहे. आम्हाला वाचवल्याबद्दल मोदी सरकारचे आभार’ असे इस्रायलची राजधानी तेल अवीव येथून मायदेशी परतलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले. आणखी एका विद्यार्थ्याने सांगितले की, मोदी सरकारने आम्हाला परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केले आहे. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. माझे आई-वडील खूप काळजीत होते आणि मी परत आल्याने त्यांना खूप आनंद झाल्याचे त्याने सांगितले.
इस्त्रायलमध्ये 18 हजारांहून अधिक भारतीय राहत आहेत. सर्वांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. त्यासाठीची नोंदणी गुऊवारपासून सुरू झाली आहे. मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांना विमानासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. त्यानुसार बरेचजण नोंदणी करत आहेत. तर, काहीजण अजूनही इस्रायलमध्ये राहण्यास सज्ज असल्याचे दिसत आहेत. तेथील सरकारवर आपला विश्वास असल्याचे सांगून अनेकांनी नोंदणी करण्यास नकार दर्शवला आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या सैनिकांनी इस्रायलवर 5 हजार रॉकेट डागले होते. त्याचवेळी सीमेवरून घुसलेल्या हमासच्या सैनिकांनी दक्षिण इस्रायलमध्ये नरसंहार घडवला. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी सुमारे 4,500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने 1,500 हून अधिक हमास लढवय्ये मारल्याचा दावा केला आहे.









