पुणे / वार्ताहर :
शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांकडून मंगळवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. गुन्हे शाखेसह प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत संयुक्त कारवाईत तब्बल 2 हजार 116 गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन 602 जणांना अटक केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचसह सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेतील विविध पथकांनी मंगळवारी रात्री साडेनऊ ते पहाटे दोन वाजेपर्यंत शोधमोहिम राबवून 602 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. त्याशिवाय आर्म ऍक्टप्रमाणे 10 कारवाया करुन 11 जणांना, मुंबई प्रोव्हिबीशन कायद्यानुसार 46 जणांना तर, जुगार ऍक्टखाली 28 जणांना अटक केली आहे. दरम्यान, सहकारनगर, स्वारगेट, वारजे, अलंकार, चंदननगर, लोणीकंद, हडपसर, बिबवेवाडी पोलिसांनी बेलेबल आणि नॉन बेलेबल वॉरंटची उत्कृष्ठपणे बजावणी केली आहे.
कोम्बिंग ऑपरेशनवेळी हॉटेल आणि ढाबे लॉजेस तपासण्यात आले. त्याशिवाय बसथांबे, रेल्वेस्थानक, एसटी स्थानकावर गस्त घालण्यात आली. नाकाबंदीदरम्यान 934 वाहन चालकांना अडवून 213 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 46 हजारांचा दंड वसूल केला आहे. पुणे शहरात आगामी सणउत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱयामुळे पुणे पोलीस अर्लट झाले आहेत. त्याअनुषंगाने सराईतांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.








