याच काळात 27 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी/ पणजी
जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या दहा महिन्यांच्या काळात गोव्यात 210 एचआयव्ही रुग्ण सापडले असून त्याच काळात 27 जणांचा बळी गेल्याची माहिती गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या अहवालातून देण्यात आली आहे.
एचआयव्ही बाधित 210 रुग्णांपैकी 146 पुरूष, 61 महिला तर 3 तृतीयपंथी आहेत. त्यात 25 ते 34 या वयोगटातील 76 बाधीत आहेत. पुरूषांपैकी 146 मध्ये 25 ते 34 वयोगटातील 57 रुग्ण आहेत. 61 महिलांपैकी 35 ते 49 वयोगटातील 24 रुग्ण आहेत. 14 वर्षांखालील 2 जणांना तर 50 वर्षांवरील 33 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. बार्देश तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 46 रुग्ण आहेत. सासष्टी 33, मुरगाव 27, तिसवाडी 26 अशी इतर तालुक्यातील आकडेवारी आहे.
असुरक्षित लैंगिक संबंध हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे अहवालात नमूद केले आहे. अहवालानुसार 210 रुग्णांपैकी 204 जणांना असुरक्षित संबंधामुळे एचआयव्ही बाधा झाली आहे.
गेल्या दहा महिन्यांत मृत्यू झालेल्या 27 जणांमध्ये 18 पुरूष तर 9 महिला आहेत. त्या काळात 1 लाखापेक्षा अधिक रक्ताचे नमुने एचआयव्ही, एड्स तपासणीसाठी आले होते. त्यातील 210 जणांना एचआयव्ही बाधा झाल्याचे चाचणीतून समोर आले आहे. पालकांकडून मुलास एचआयव्ही लागण होण्याची 4 प्रकरणे समोर आली असून दूषित सुईमुळे 2 प्रकरणे घडल्याचे निष्पन्न झाले आहे.









