आज बंगळूरला इस्रोस भेट देणार
कोल्हापूर : मुलगा किंवा मुलगी महापालिकेच्या शाळेत शिकते असं सांगितले की कोल्हापुरात बहुतेकांच्या चेहऱ्यावर नकारात्मक भाव ठरलेला. पोराचं तुम्ही नुकसान केले असं म्हणायलाही काहीजण पुढे. बरं, त्याला कारणही तसेच कारण महापालिकेच्या शाळांची दुरावस्था. रिकामे वर्ग. साध्या इमारती. कोणताही चकाचक युनिफॉर्म नाही. इतर डामडौल नाही. पण आज याच महापालिका शाळेतील २१ मुले बंगळूरला अवकाश संशोधन केंद्रास (इस्रो ) भेट द्यायला विमानाने गेली आणि शाळा केवळ बाह्य रूपावर चांगली नसते. तर शाळेत ज्ञानांजन कसं होतंय यावरच शाळा चांगली किंवा वाईट ठरते याची या २१ मुलांनी सर्वांना जाणीव करून दिली .
गतवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महापालिकेच्या ५६ विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकाविले होते, यापैकी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या २१ विद्यार्थ्यांची बंगळूरु येथील इस्रेला भेट देण्यासाठी निवड करण्यात आली. सोमवारी महापालिकेच्या चौकातून सकाळी १२ वाजता रवाना झाले आहेत. या विद्यार्थ्यांना के.एम.टी.च्या वातानुकुलीत सजविलेल्या बसमधून विमानतळापर्यंत सोडण्यात आले.
कोल्हापूर महापालिकेच्या शाळा म्हणजे शिक्षणातलं आपल्याला फार कळतंय असं समजणाऱ्यांना तर सहज टीका टिप्पणी करण्याची एक चालून आलेली संधी . या शाळेत वर वर बघितलं तर वातावरण निर्मितीत शंभर उणिवा त्यामुळे या शाळांच्या वाट्याला कधी कौतुकच आलं नाही. पण शाळेत आज काय चाललंय हे कोणी पहाण्याची कधी तसदीच घेतली नाही पटसंख्या कमी असू दे. इथे शिक्षक आणि मुलांचे नाते अगदी पालकांच्या सारखे. स्कॉलरशिप परीक्षेत तर या पोरांची खणखणीत कामगिरी. अशीच खणखणीत कामगिरी करणारी मुले सोमवारी बंगलोरला विमानाने रवाना झाली.
कालपर्यंत आकाशातूनच जाणारे विमान गल्लीबोळातून पाहणारी ही मुले आज चक्क विमानात बसली. सर्वांचे पालक विमानतळावर निरोप द्यायला आले होते. बहुतेक पालकांनीही आज एवढ्या जवळून पहिल्यांदाच विमान पाहिले . आपली मुलं निळा ब्लेझर घालून विमानाकडे चालली तेव्हा या गरीब, मध्यमवर्गीय पालकांच्या चेहऱ्यावर कोणतेही विशेषण लावता येणार नाही अशी आनंदाची एक लहर उमटली. दीड तासाच्या प्रवासानंतर मुले बंगळूरला पोहोचली. आज ते इस्त्रोला भेट देणार आहेत. परवा ते परत येणार. त्यांच्यासोबत शिक्षक सुनील पाटील वंदना कमले प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे बाळासो कांबळे, संजय शिंदे आहेत. यावेळी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व रवाना करण्यासाठी आमदार अमल महाडिक, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते. या मोहिमेसाठी कोल्हापूर महानगरपालिकाच्या प्रशासक के मंजूलक्ष्मी यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले आहे. तर उपायुक्त साधना पाटील यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे.
लाईव्ह माहिती विद्यार्थ्यांना मिळणार
बंगळूरु येथील इस्रोला दि. ११ व १२ फेब्रुवारी रोजी भेट दिली जाणार आहे. याकरिता विद्यार्थ्यांना एक वेळ विमानाने प्रवास, परतीचा रेल्वेने प्रवास व संबंधित पर्यटन बसद्वारे केले जाणार आहे. या मोहिमेत इसरोचे इस्ट्रक्ट तसेच मोक्स व पीन्या हा औद्योगिक परिसर पाहण्याची संधी मिळणार आहे. इस्ट्रक्ट या ठिकाणी ग्राउंड ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये सॅटेलाईट कडून येणारे मेसेज पृथ्वीपर्यंत कसे येतात इथून सॅटेलाईट पर्यंत कमांड कशा जातात, इस्रोचे एखाद्या लेटेस्ट ऑपरेशन सुरू असेल तर त्याविषयीही लाईव्ह माहिती विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. सॅटॅलाइट प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेले इंजिन तसेच भारतीय बनावटीचे मॉडेल्स त्याचबरोबरच जवाहरलाल नेहरू प्लेनोटेरियममध्ये थ्रीडी शो प्लेनोटेरियमही पहावयास मिळणार आहे.









