सिंधुदुर्गातील पाच जणांना अटक, पेडणे पोलिसांची कारवाई
पेडणे : मालपे पेडणे येथील क्रिएटिव्ह अॅण्ड बेस्ट टेक्नॉलॉजी या कंपनीच्या गोदामातून फ्लिपकार्ड ई सेवेमार्फत ऑर्डर केलेले ग्राहकांचे 4,81,215 हजार ऊपये किमतीचे 21 मोबाईल संच चोरी प्रकरणी पेडणे पोलिसांनी सिंधुदुर्गातील सातार्डा, कवठणी, आरवली आणि इतर भागातील पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद कऊन पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी सामील असलेले विराज वसंत वेंगुर्लेकर (22, रा. मेसावडी-सातार्डा, सावंतवाडी), श्रीधर अनिल राऊळ (22, रा. बालोजीवाडा कवठणी), वैभव अनिल सातार्डेकर (24, रा. गावडेवाडा आरवली), हर्षल ज्ञानेश्वर गोवेकर (रा. सातारा) व गौरव (रा. कवठणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी सदर कंपनीच्या साहाय्यक व्यवस्थापक असलेले कृष्णा ज्ञानेश्वर गोवेकर (रा. सातार्डा) यांनी मालपे पेडणे येथील कंपनीच्या गोदामातून 21 मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार पेडणे पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पेडणे पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी तपास केला असता सदर कंपनीतच काम करत असलेले सामानाचे विभाजन करणारे कर्मचारी तसेच दोन डिलिव्हरी बॉय मिळून पाच कर्मचारी या चोरी प्रकरणात सामील असल्याचे उघड झाले. पाचही जणांना पेडणे पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. ग्राहकांनी फ्लिपकार्ड या सेवेद्वारे विविध कंपनीचे मोबाईल मागवले होते. ग्राहकांनी मागवलेले मोबाईल सदर गोदाममध्ये आल्यानंतर या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर त्यांची चोरी केली. पेडणे पोलिसांनी चौकशी दरम्यान 14 मोबाईल ताब्यात घेतले असून त्यांची किंमत सुमारे तीन लाख दहा हजार ऊपये होते. अजूनही सात मोबाईल ताब्यात घेण्याचे राहिले आहेत. पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर, कॉन्स्टेबल तीर्थराज म्हामल, प्रेमनाथ सावळ देसाई, तीर्थराज उगवेकर, सचिन हळर्णकर यांनी ही कारवाई केली.









