पुणे / वातार्हर :
मागील काही दिवसांपासून राज्यात ऑनलाइन गुन्हेगारी वाढत असून, टेलिग्रामच्या माध्यमातून टास्क रिव्ह्यू कामाच्या बहाण्याने फसवणुकीचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. अशाचप्रकारे पार्ट टाइम जॉब देण्याच्या बहाण्याने पुण्यातील दोन जणांची तब्बल 21 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदू कृष्ण मुरलीधरन नायर (वय 32, रा. वाघोली, पुणे) यांनी अज्ञात टेलिग्राम आयडी धारक व वेगवेगळे बँक खातेदार आणि मोबाईल वापरकर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. संबंधित टेलिग्राम आयडी धारक यांनी गुगल मॅपवर पेजला रिव्ह्यू आणि रेटिंग देण्याच्या बाहण्याने वेगवेगळे टास्क नंदू नायर यांना दिले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळय़ा अल्पावधीत नफा मिळवून देणाऱ्या योजना सांगून त्यामध्ये सुमारे 17 लाख 75 हजार रुपये त्यांना विविध बँक खात्यात भरण्यास लावण्यात आले. त्यानंतर ग्लोबल इंडिया व्ह्यू पेजेस या वेबसाईटच्या प्रोफाईलमध्ये त्यांची बॅलन्स रक्कम दाखवून, मूळ रकमेवर कोणत्याही प्रकारचा नफा न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत सायबर पोलीस ठाणे पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत ओमकार नरेश गरुडकर (24 ,रा. कोथरूड, पुणे) यांनी तीन टेलिग्राम आयडी धारक व वापरकर्ते आणि वेगवेगळे बँक खातेदार व मोबाईल धारक यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ओमकार गरुडकर यांना आरोपींनी युटय़ूबवरील व्हिडिओ लाईक व वेगवेगळे टास्क देऊन एकूण तीन लाख 56 हजार रुपये त्यांना बँक खात्यांमध्ये भरण्यास सांगून एका वेबसाईटच्या आयडीवर त्यांच्या असेटमध्ये बॅलन्स रक्कम दाखवून त्यांची मूळ रक्कम किंवा कोणत्याही प्रकारचा नफा न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पुढील तपास करत आहेत.









