‘रामनगरी’ अयोध्येत दीपोत्सवाची आगळीवेगळी तयारी : यंदा भव्य-दिव्य उत्सव साजरा होणार
वृत्तसंस्था /अयोध्या
अयोध्येतील भगवान रामाच्या नगरीत दीपोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यावेळचा दीपोत्सव खूप खास असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिरात रामलल्ला विराजमान होण्यापूर्वीचा यंदाचा हा उत्सव ऐतिहासिक बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रामनगरीच्या 51 घाटांवर 21 लाख दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. तर रामनगरीतील प्रभू रामाच्या जीवनावर आधारित पारंपरिक मिरवणूक पुन्हा एकदा विशेष ठरणार आहे.
रामाची नगरी असलेल्या अयोध्येचा दिवाळी सण खूप खास असेल. लंका जिंकून भगवान राम अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी दीपोत्सव साजरा केला, अशी धार्मिक श्र्रद्धा आहे. पुन्हा एकदा देव आपल्या भव्य वाड्यात वास करणार आहे, अशा परिस्थितीत हा दीपोत्सव आगळा-वेगळा ठरणार आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वीचा सातवा दीपोत्सव अत्यंत भव्य आणि दिव्य असणार आहे. रामनगरीच्या घाटांवर 21 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार असून अयोध्येतील मठ आणि मंदिरेही या उत्सवाची साक्षीदार असणार आहेत.
यंदा अयोध्येत दीपोत्सवाचा थाट वाढवण्यासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीला बारकाईने भव्यता देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त राजपथावर चित्रकृती बनवणारे कारागीर रामनगरीतील दिव्यांच्या उत्सवादरम्यान काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेसाठी चित्ररथ बनवत आहेत. हे चित्ररथ खूप खास असतील. दिल्लीतील सर्व मुस्लीम कारागीर अयोध्येत भगवान रामाच्या जीवनावर आधारित झांकी बनवत आहेत. रामलल्लाच्या जीवनावर आधारित 11 प्रसंग तयार करण्यात येणार आहेत. प्रभू रामाच्या जीवनावर आधारित झांकी बनवणारे मुस्लीम कारागीर स्वत:ला भाग्यवान समजत आहेत. यासोबतच यावेळी रामनगरी राजपथ सारख्या ऊंद रस्त्यांनी सुसज्ज असणार आहे. भव्य-दिव्य मिरवणुकीत सहभागी झालेले कलाकार आपली अप्रतिम आणि अलौकिक कौशल्ये दाखवतील.









