गुजरातमधील घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन
वृत्तसंस्था/ बनासकांठा
गुजरातमधील बनासकांठा येथील एका कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर 21 जणांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गोदामाच्या मालकाला अटक केली आहे. गोदामाचा मालक दीपक मोहनानी याला मंगळवारी रात्री शेजारच्या साबरकांठा जिह्यातून बनासकांठा पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यानंतर या संपूर्ण घटनेची आता एसआयटी स्थापन करून चौकशी केली जात आहे.
बनासकांठा जिह्यातील डीसा शहराजवळ मंगळवारी सकाळी फटाके कारखान्यात स्फोटाची घटना घडली होती. एका गोदामात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत 21 जणांच्या मृत्यूंव्यतिरिक्त सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारने पीडित कुटुंबांना भरपाई जाहीर केली आहे. गोदामात फटाके बेकायदेशीरपणे साठवले जात होते. तसेच त्यांची निर्मितीही अयोग्यपणे केली जात होती, असे पोलीस महानिरीक्षक चिराग कोराडिया यांनी सांगितले. सदर गोदामाचे नाव दीपक ट्रेडर्स असे होते. तर दीपक मोहनानी आणि त्याचे वडील खुबचंद मोहनानी यांच्या मालकीचे हे गोदाम होते.
बनासकांठा येथील स्फोटानंतरचे दृश्य खूपच अस्वस्थ करणारे आहे. मंगळवारी सकाळी 9.45 च्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटानंतर, डीसा शहराजवळील औद्योगिक क्षेत्रात असलेले गोदाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. गोदामात उपस्थित असलेल्या कामगारांचे अवयव हवेत उडून 200-300 मीटर अंतरापर्यंत विखुरले होते. गोदामात झालेल्या स्फोटामुळे आग लागली आणि इमारतीचा एक भाग कोसळल्यामुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते. सर्व मृत मूळचे मध्यप्रदेशातील हरदा आणि देवास जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. 21 मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.









