शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यासाठी घेतल्या मोठ्या रकमा : तीसहून अधिक गुंतवणूकदारांना ‘ना व्याज ना मुद्दल’
पणजी : शेअर बाजारातून झटपट फायदा करून देणाच्या आमिषाने लोकांकडून मोठी रक्कम स्वीकारून तिची शेअर मार्केटात गुंतवणूक करण्याचे नाटक करणाऱ्या सासष्टीमधील जोडप्याने राज्यातील 30 हून अधिक लोकांना तब्बल 20 कोटी 83 लाख 90 हजार 336 ऊपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. याबाबत आर्थिक गुन्हे विरोधी विभागाने भादंसंच्या कलम 406 व 420 अंतर्गत दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांमध्ये मेरॉन रॉड्रिगिज (वय 53) आणि त्याची पत्नी दीपाली परब (वय 40) यांचा सहभाग असून दोघेही व्हिला क्रमांक 10, कोस्टा निन्हो विर्डी, किरभाट नुवे सासष्टी येथे राहणारे आहेत.
व्याजही नाही, अन् मुद्दलही नाही
शेअर बाजारात गुंतवणूक करणार असल्याचे सांगून लोकांकडून मोठी रक्कम स्वीकारली जायची. गुंतवणूकदारांना 25 ते 45 टक्केपर्यंत व्याज तसेच मूळ रक्कम दिली जाईल, असे आश्वासन दिले जायचे. मात्र ठरलेली वेळ उलटून गेली तरी व्याज मिळाले नाही आणि मूळ रक्कमही मिळाली नसल्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आणि त्यांनी ही तक्रार दाखल केली. मेरॉन रॉड्रिगीज स्टॉक ब्रोकर म्हणून गुंतवणूकदारांचे प्रतिनिधीत्व करीत होता, तर त्याची पत्नी दीपाली परब ही गुंतवणूक सल्लागार म्हणून काम पाहत होती. 20 डिसेंबर 2011 ते 15 जुलै 2023 या कालावधीत या जोडप्याने तीसहून अधिकजणांना मिळून तब्बल 20 कोटी 83 लाख 90 हजार 336 ऊपयांचा गंडा घातला आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनइएफटी), रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस), तसेच धनादेशांद्वारे गुंतवणूकदारांना हा मेरॉन रॉड्रीगीज आपल्या खात्यात पैसे वळवण्यास सांगायचा. कमी वेळेत मेठे व्याज मिळणार या आशेने गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले होते. मात्र नंतर त्यांची घोर फसवणूक झाल्याचे उघड झाले.
झटपट पैसा कमविण्याचे व्यसन
राज्यात आर्थिक गुन्हेगारीची प्रकरणे वाढली आहेत. पोलीस खात्याकडून वेळोवेळी लोकांमध्ये जागृती करण्याचे प्रयत्न केले जातात, मात्र वेळोवेळी लोकांना कोट्यावधी ऊपयांचा गंडा घालण्याचे प्रकार सुऊच असल्याने ती एक चिंतेची बाब बनली आहे. लोकांना झटपट पैसे मिळविण्याचे व्यसन लागले असल्याने लोक अशा फसवेगिरीला बळी पडतात आणि फसवणूक करून घेतात, असेच दिसून आले आहे.