मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांची कारवाई : कामात कुचराई
बेळगाव : एलअॅण्डटी कंपनीने कोणतीच कामे वेळेत केली नाहीत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सदर कंपनीने 21 कोटी 46 लाख 78 हजार रुपये दंड द्यावा, असे सुनावले आहे. सदर कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र ती कामे वेळेत पूर्ण केली नाहीत. त्यामुळे दंड भरावा, असे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. आतापर्यंत केवळ 36 टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित काम कधी पूर्ण करणार? असा प्रश्नदेखील त्यांनी स्मार्ट सिटी आणि एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारला होता. त्यावेळी त्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली होती. याबाबत सारासार विचार करून आता महापालिका आयुक्तांनी तुमच्याकडून हा दंड का वसूल करू नये, नियमानुसार सर्व कामे वेळेत झाली पाहिजेत. कामे वेळेत झाली नाही तर नियमानुसार दंड वसूल करणे कायद्यानेच परवानगी दिली आहे. कोणत्याही कामाचा एक अवधी दिला जातो. मात्र त्या अवधीमध्ये काम झाले नाही तर त्यावर दंड आकारला जातो. याची माहिती तुम्हाला आहे की नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
स्मार्ट सिटी आणि एलअॅण्डटी कंपनीच्या कामाबद्दल मनपा आयुक्त दुडगुंटी यांनी असमाधान व्यक्त केले होते. त्यानंतर कायदा सल्लागारांशी चर्चा करून त्यांनी हा दंड आकारण्याचा निर्णय घेतला. यापुढे सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची सक्त ताकीदही देण्यात आली आहे. यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.









