250 मुलींच्या लैंगिक शोषणाची कहाणी
‘अजमेर 92’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. वादात सापडूनही हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे. हा चित्रपट 1992 मधील अजमेर स्कँडलवर आधारित आहे. युवतींना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना 1992 मध्ये घडली होती. कित्येक युवतींनी लैंगिक शोषणाला कंटाळून आत्महत्या केली होती. रिलायन्स एंटरटेनमेंट प्रेझेंट्सच्या बॅनर अंतर्गत निर्मित या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर शहारे आणणारा आहे.

अजमेरमधील प्रभावशाली लोकांनी युवतींचे लैंगिक शोषण केल्याचे ट्रेलरमध्ये दर्शविण्यात आले आहे. यात 1987-92 पर्यंतचा कालावधी दाखविण्यात आला आहे. त्यावेळी अजमेरच्या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या 250 युवतींचे लैंगिक शोषण झाले होते. युवतींना ब्लॅकमेल करत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेनंतर अजमेरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आत्महत्या करणाऱ्या युवतींप्रकरणी त्यावेळी मोठे राजकारण झाले होते. तसेच पोलिसांच्या निष्क्रीयतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंह यांनी केले आहे. याच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 21 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात करण शर्मा, सुमित सिंह, जरीना वहाब, बृजेंद्र काल, सयाजी शिंदे आणि मनोज जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.









