रत्नागिरी / सुकांत चक्रदेव :
विविध कारणातून आत्महत्या करणाऱ्या सामान्य माणसांच्या आत्महत्येच्या घटनांना समाजाकडून दखलपात्रता मिळत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे जिल्हा पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. २०२३ मध्ये १९१, २०२४ मध्ये १७३ तर यावर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत हा आकडा २०७ वर पोहचला आहे. आत्महत्येने जीवनाचा शेवट करणाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या तिप्पट असल्याचे आकडेवारी सांगते.
जिल्ह्यात २०२३ मधील आत्महत्यांचा विचार करता महिलांची संख्या ४४ असताना पुरुषांची १४७ आहे. महिलांच्या संख्येच्या तिप्पट पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. २०२४ मध्ये हीच परिस्थिती कायम आहे. ४२ महिला आणि १३१ पुरुषांच्या आत्महत्या नोंदवल्या आहेत. येथे तिपटीपेक्षा जास्त पुरुषांच्या आत्महत्या आहेत. चालू वर्षात २०२५ मध्ये जुलैपर्यंत ४५ महिला आणि १६२ पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. या कालावधीत देखील पुरुषांची संख्या महिलांपेक्षा तिप्पट आहे.
- आजारपणाला कंटाळून प्रमुख कारण
आत्महत्येची विविध कारणे पोलीस यंत्रणनेने गोळा केली आहे. त्यामध्ये आजारपणाला कंटाळून आत्महत्या हा घटक खूप मोठा आहे. खरे तर ही आरोग्य व्यवस्थेची दुर्दैवी किनार आहे. प्रत्येक तालुक्यात शासकीय रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालये आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येक पंचक्रोशी ठिकाणी आहे. खासगी, वैद्यक व्यवसायिक ठिकठिकाणी आहेत. असे असताना आजाराला कंटाळून आत्महत्या करावीशी वाटणारे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. एखादा रोग बरा होणारा नाही पण त्या रोगा सोबत जीवन जगता येईल अशी सुविधा कोणतीच उपचार पद्धती देत नसावी का? जिल्ह्यात २०२४ साली आजारपणाला कंटाळून मृत्यू झालेले ५३ आहेत, २०२४ साली ३२ लोक आहेत. आणि चालू वर्षी २८ लोकांनी याच कारणासाठी जीवन संपवले आहे.
कौटुंबिक वाद हे दुसरे कारण आत्महत्यांसाठी कौटुंबिक कलह हे दुसरे कारण ठरले आहे. हे प्रमाण लक्षणीय आहे. यात महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे. २०२३ मध्ये ५३ जणांनी, २०२४ मध्ये ६० जणांनी आणि २०२५ मध्ये २३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. खरे पाहता न्यायालयामध्ये कौटुंबिक विवादावरून प्रकरण निकाली करण्याची व्यवस्था आहे. पती पत्नीमध्ये पटत नसेल तर समुपदेशनाने त्यांच्यात समेट व्हावा म्हणून विधी सेवा प्राधिकरणाने व्यवस्था केली आहे. यामध्ये स्त्रीने पुढाकार घेतला तर ते काम मोफत स्वरुपात केले जाते. याशिवाय मानसोपचार क्षेत्रातील खासगी समुपदेशक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी रत्नागिरी जिल्ह्यात किमान २५ वकिलांना मध्यस्थ म्हणून प्रशिक्षित केले आहे. ही सर्व व्यवस्था असतानाही कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आले आहे. काहीसा प्रेमप्रकरणातून आत्महत्या हा दोघांमधील वादाचाच परिणाम मानला जात आहे. फक्त ती दोघे विवाहबंधनात नसल्यामुळे प्रेमप्रकरण अशी श्रेणी त्याला देण्यात आली आहे. जिल्ह्यात २०२३ मध्ये १५, २०२४ मध्ये ११, २०२५ मध्ये ५ जणांनी आपले जीवन संपवले. प्रेमप्रकरणाच्या संदर्भात देखील जीवन संपवणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे.
- मानसिक अस्वास्थ्यामुळे
सर्वात दुर्लक्षित राहिलेला भाग म्हणजे मानसिक स्वास्थ्य हरपल्याने किंवा वेडाच्या लहरीत २०२३ मध्ये १७ लोकांनी, २०२४ मध्ये २१ लोकांनी, २०२५ मध्ये ६ लोकांनी आपले जीवन संपवले आहे. या लोकांना वेळीच मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखल केले असते तर त्यांना वाचवता आले असते. कुटुंबिय आणि नातेवाईक, परिचित लोकांनी मानसिक अस्वस्थ लोकांना लवकरात लवकर उपचार घेण्याविषयी योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे. परंतु भारतीय समाजात मानसिक अस्वस्थता हे एक लांच्छन समजले जाते.
- दारूच्या नशेमुळे
बेकायदेशीर दारूवर कठोर कारवाई करू, ग्रामसुरक्षा दलाने तत्परतेने काम करावे असे पोलीस अधिकारी सांगत असतात. गावोगाव हातभट्टीचा व्यवसाय तेजीत असतो. तळीरामांना भरपूर प्रमाणात दारू उपलब्ध असते. खरे तर सतत दारू प्यावीशी वाटणे हाच एक मनोविकार आहे. मनोविकार तज्ज्ञ त्यासाठी औषध योजना करत असतात. मात्र दारूच्या अधीन झालेली व्यक्ती उपचार मिळावेत म्हणून मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे आवश्यक आहे. कुटुंबियांवर घरात चांगले वातावरण ठेवण्याची देखील जबाबदारी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २०२३ साली २५, २०२४ साली २६, २०२५ साली आतापर्यंत ३६ लोकांनी दारूच्या नशेत जीवन संपवले. याला पोलीस यंत्रणा किंवा राज्य उत्पादन शुल्क खात्याची यंत्रणा जबाबदार नाही असे म्हणणे योग्य ठरेल?
नोकरी मिळत नाही म्हणून आणि त्याहीपेक्षा जोडीदारीण मिळत नाही म्हणून काही लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारीपणामुळे २०२३ साली ६. २०२४ साली २, २०२५ साली २ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या जसा महत्वाचा मुद्दा आहे तसा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करायला लागणे हाही लांच्छनास्पद मुद्दा आहे. सरकारी बँका, सहकारी बँका व पतपेढ्या असताना आत्महत्या कराव्या लागतात यावर सहकार खाते खरच लक्ष देणार का? असा प्रश्न उभा आहे. सावकारी नियंत्रणाची जबाबदारी सहकार खात्याकडे सोपवण्यात आली आहे. असे असताना कर्जबाजारीपणाचा विळखा लोकांना असह्य का होतो याचा विचार मात्र सहकार खाते करत नाही ही मोठी चिंता आहे. जवळची व्यक्ती मयत झाली म्हणून २०२३ मध्ये ५, २०२४ मध्ये ८, २०२५ मध्ये ३ लोकांनी आत्महत्या केली.
- कुटुंबियांची भूमिका महत्वाची डॉ. कृष्णा पेवेकर
कोविडनंतर सामाजिक परिस्थिती बदलली. लोकांची जीवनशैली देखील बदलली. कुटुंब म्हणून असलेली मूल्ये देखील बदलत आहेत. समाजमाध्यमामुळे आभासी जीवनात लोक असतात. प्रत्यक्ष जीवनात विचारांची देवाणघेवाण होत नाही. त्यातून निराशा येत आहे. कुटुंबिय, निकटवर्तीयांची भूमिका खूप महत्वाची असते. कोणी व्यक्ती आत्महत्येचा विचार बोलून दाखवत असेल तर ते हलक्यात न घेता त्यावर योग्य उपचार झाले पाहिजेत. म्हणजे टोकाचे पाऊल उचलले जाणार नाही. वैचारिक, भावनिक मुद्यांची देवाणघेवाण कुटुंबस्तरावर वाढायला हवी. म्हणजे हे प्रश्न कमी होतील, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णा पेवेकर म्हणाले.
- मन हलकं करणं गरजेचंः सचिन सारोळकर
मानसिक स्वास्थ्यात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे निरीक्षण लक्षात घेता मागील पाच वर्षापासून अर्थात कोरोनानंतर जीवनाशी संघर्ष करण्याची परिस्थिती अधिक आव्हानात्मक होत असल्याचे दिसून आले आहे. ही परिस्थिती यापूर्वी होतीच. परंतु त्याला सामना करायची, सामोरे जायची तंत्रपद्धती, जीवन कौशल्य यामुळे प्रश्न गंभीर होत आहे. सहिष्णूता कमी होत आहे. यासाठी मानसिक स्वास्थ्यात काम करणाऱ्या तज्ज्ञांशी संवाद साधणं, कोणाशी तरी बोलून मन हलकं करणं, मानसिक प्रथमोपचार पद्धतीचा अवलंब करणं योग्य ठरतं. शक्य तेथे शास्त्रीय उपचार पद्धतीचा अवलंब करणेही केव्हाही चांगले. शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजार असतात हे स्वीकारले पाहिजे, असे मत मानस शास्त्रज्ञ सचिन सारोळकर यानी व्यक्त केले.
- आत्महत्यांच्या प्रश्नावर गांभिर्याने लक्ष देण्याची गरज
लोकप्रतिनिधी हे राज्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग म्हणून समजले जातात. राज्यात लोकांना आत्महत्या करायला लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या लोकांनी प्रयत्न करणे अपेक्षित असते. सरपंच, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य असोत अथवा आमदार खासदार असोत अगदी मंत्री महोदयही असोत. यापैकी कोणी आत्महत्यांच्या प्रश्नाला अधोरेखित केलेले नाही. परिचित, जवळची व्यक्ती अडचणीत सापडली, प्रसंगी त्याने आत्महत्या केली तर कुटुंबाचे सांत्वन करायला काही लोक जातात. पण आत्महत्या हा समाजावरचा मोठा डाग आहे असे म्हणून त्या प्रश्नाला उत्तर शोधण्याचे काम काही होत नाही.
- योग्य समुपदेशनाने आत्महत्या टाळू शकतो: श्रद्धा कळंबटे
आत्महत्येला प्रवृत्त होणाऱ्यांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे. आमच्याकडे येणाऱ्या प्रकरणात असं दिसून येतं की स्त्रिया या सोशिक, सहनशील, कष्टाळू, मनाने खंबीर, कुटुंब- मुलांची काळजी करणाऱ्या असतात. याउलट पुरुष बेफिकीर, मनाने कमकुवत, चटकन व्यसनाच्या आहारी जाणारे असतात. त्यामुळे ते आत्महत्येला लवकर बळी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा व्यक्तींना योग्य वेळी योग्य समुपदेशक मिळाल्यास आपण त्यांना आत्महत्येपासून निश्चितच परावृत्त करू शकतो. आयुष्यात पुन्हा उभं करू शकतो असं दिसून आलं आहे यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी अशा लोकांना प्रेम, माया देऊन त्यांची मानसिकता समजून घेऊन आधार दिला पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी मांडले.








