मणिपूर पोलीस महासंचालक, वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचे नाव सामील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूरचे पोलीस महासंचालक राजीव सिंह समवेत अन्य 204 पोलिसांना 2023 साठी केंद्रीय गृहमंत्र्यांचे स्पेशल ऑपरेशन मेडल प्रदान करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विविध पदांवर काम केल्यावर आता सीआरपीएफमध्ये तैनात होणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमित कुमार यांचे नाव देखील यादीत सामील आहे.
मणिपूरमध्ये मे महिन्यात हिंसा सुरू झाल्यावर आयपीएस अधिकारी अमित कुमार यांना मणिपूर पोलीस प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. सीआरपीएफमधील महानिरीक्षक म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी हे पदक देण्यात येणार आहे. पदकासाठी निवडण्यात आलेल्या 204 पोलीस कर्मचारी हे 10 राज्यांसह सीआरपीएफ, एनआयए आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोशी संबंधित आहेत. या 10 राज्यांमध्ये आंध्रप्रदेश, आसाम, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडचा समावेश आहे.
गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी दीपक भद्रन आणि त्यांच्या टीमलाही होम मिनिस्टर स्पेशल ऑपरेशन मेडलसाठी निवडण्यात आले आहे. भद्रन आणि त्यांच्या टीमने मागील वर्षी 1500 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते.
हे पदक दहशतवादाचा मुकाबला करणे, सीमेवरील कारवाई, शस्त्रास्त्र नियंत्रण, अमली पदार्थांची तस्करी रोखण्याकरता दिले जाते. दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी हे पदक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात येते.









