वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2027 मधील एएफसी आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी आपला प्रस्ताव दाखल केला असल्याची माहिती राष्ट्रीय फेडरेशनने दिली. यजमानपदाच्या या शर्यतीत बाजी मारली तर भारतात ही स्पर्धा भरवली जाण्याची ही पहिलीच वेळ ठरेल. यजमानपदाचा प्रस्ताव दाखल केल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे महासचिव कुशल दास यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
काहीच दिवसांपूर्वी आशिया फुटबॉल कॉन्फेडरेशनने या स्पर्धेसाठी यजमानपदाचा प्रस्ताव दाखल करण्याची मुदत वाढवली होती. प्रारंभी यासाठी दि. 31 मार्चपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुभा होती. पण, कोव्हिड-19 चा प्रकोप उद्भवल्यानंतर ही मुदत दि. 30 जूनपर्यंत वाढवली गेली आहे.
आशिया फुटबॉल कॉन्फेडरेशनचा शक्य तितक्या लवकर या स्पर्धेसाठी यजमानपद निश्चितीचा विचार आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभीच याबाबत घोषणा होणे अपेक्षित आहे. भारताशिवाय, केवळ सौदी अरेबियानेच या स्पर्धेच्या यजमानपदासाठी स्वारस्य दाखवले आहे. सौदी अरेबियाने ही स्पर्धा यापूर्वी तीनवेळा जिंकली आहे. पण, यजमानपदाची संधी त्यांना आतापर्यंत एकदाही मिळालेली नाही.
भारताने यापूर्वी 2023 मधील एएफसी आशिया चषक स्पर्धेसाठी यजमानपदाची तयारी दर्शवली होती. थायलंड, इंडोनेशिया व दक्षिण कोरिया हे देखील यजमानपदाच्या शर्यतीत होते. पण, नंतर ऑक्टोबर 2018 मध्ये भारताने आपला प्रस्ताव मागे घेतला होता. त्यानंतर थायलंड व कोरिया या देशांनीही माघार घेतली व इच्छुकांच्या यादीत फक्त चीन बाकी राहिले आणि त्यांच्या दावेदारीवर शिक्कामोर्तब झाले.
भारताने यापूर्वी 2017 मध्ये पुरुष गटातील यू-17 विश्वचषक
स्पर्धा यशस्वीरित्या भरवली. त्यानंतर यंदा नोव्हेंबर महिन्यात महिला गटातील विश्वचषक स्पर्धा भारतातच होणे अपेक्षित होते. पण,
कोरोना महाप्रकोपामुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकत असल्याची घोषणा दोनच दिवसांपूर्वी
झाली
आहे.
भारताला याशिवाय, 2022 महिला एएफसी आशियाई चषक स्पर्धेचे यजमानपदही लाभले आहे. भारताने एएफसी आशियाई स्पर्धेत आतापर्यंत चारवेळा सहभाग घेतला असून 1964 मध्ये उपजेतेपदापर्यंत पोहोचले, ही त्यांची स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यावेळी ती स्पर्धा राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवली गेली आणि फक्त चार देशांनीच त्यात सहभाग घेतला होता. भारताला याशिवाय, 1984, 2011 व 2019 मध्ये संपन्न झालेल्या अन्य तीन स्पर्धांमध्ये साखळी फेरी देखील पार करता आली नाही.









