वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2026 मध्ये होणार असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत 19 जुलै रोजी न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये खेळविली जाणार आहे. फुटबॉलच्या महासंग्रामातील शिखर लढतीचे यजमानपद भूषविण्याच्या बाबतीत न्यू जर्सीने टेक्सास आणि कॅलिफोर्नियावर मात केली आहे. ‘फिफा’ने 1.6 अब्ज डॉलर्स खर्चून उभारण्यात आलेल्या सदर स्टेडियमवर ही अंतिम लढत खेळविण्याचे निश्चित केले आहे. हा स्टेडियम 2010 मध्ये खुला करण्यात आला होता.
या स्पर्धेची व्याप्ती वाढीव राहणार असून 48 राष्ट्रांचा त्यात समावेश राहणार आहे तसेच 104 सामने खेळविले जाणार आहेत. पहिल्यांदाच तीन राष्ट्रांमध्ये या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. मॅनहॅटनपासून सुमारे 10 मैलांवर स्थित मेटलाइफ स्टेडियमला न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या दोन्हींचा पाठिंबा लाभला होता. सदर रविवारी साऱ्या जगाचे लक्ष या स्टेडियमकडे लागून राहणार आहे. लायोनेल मेस्सीचा अर्जेंटिना सलग दुसरे विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतो की, नवीन उत्तराधिकारी उदयास येतो, हे तेथे स्पष्ट होईल.
‘फिफा’ने रविवारी मियामी टेलिव्हिजन स्टुडिओमध्ये ही घोषणा केली. 39 दिवस चालणार असलेल्या या स्पर्धेचा पहिला सामना 11 जून रोजी मेक्सिको सिटीतील एस्तादियो आझतेका स्टेडियमवर होईल. उपांत्यपूर्व फेरीपासूनचे सर्व सामने अमेरिकेत खेळले जाणार आहेत. उपांत्य फेरी 14 जुलै रोजी एटी अँड टी स्टेडियमवर आणि 15 जुलै रोजी अटलांटा येथील मर्सिडीज बेंझ स्टेडियमवर होणार आहे.
1930 मध्ये पहिल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर अमेरिकेला फक्त एकदाच 2002 मध्ये या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठता आलेली आहे. या स्पर्धेतील 104 पैकी 78 सामने अमेरिकेत, तर प्रत्येकी 13 मेक्सिको आणि कॅनडात खेळविले जाणार आहेत.









