विश्व फेडरेशनचा निर्णय, 2023 सुदिरमन चषक स्पर्धेचे यजमानपद चीनकडे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2026 मध्ये होणाऱया वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे यजमानपद भारताला दिले असल्याचे विश्व बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) मंगळवारी जाहीर केले. भारतात दुसऱयांदा या स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
2023 मध्ये होणारी सुदिरमन चषक स्पर्धा आधीच्या नियोजनानुसार भारताला देण्यात आली होती. पण त्यात बदल करून या विश्व मिश्र सांघिक स्पर्धेचे यजमानपद चीनला देण्याचा निर्णय बीडब्ल्यूएफने घेतला आहे. यावर्षीची सुदिरमन चषक स्पर्धा चीनमधील सुझोयू येथे होणार होती. पण कोव्हिड 19 मुळे ही स्पर्धा चीनऐवजी फिनलंडमधील वान्टा येथे आयोजित करण्याचा निर्णय फेडरेशनला घ्यावा लागला होता. ‘सुझोयू येथे आता 2023 मधील विश्व मिश्र सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली जाईल. ही स्पर्धा भारताला बहाल करण्यात आली होती. पण भारताने आता त्याऐवजी 2026 मधील वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा भरविण्यास मान्यता दिली आहे, असे बीडब्ल्यूएफने पत्रकाद्वारे सांगितले.
‘सुझोयू येथे आता 2023 मधील सुदिरमन चषक अंतिम स्पर्धा घेतली जाणार, हे आता निश्चित करण्यात आले आहे. 2021 मध्येच ही स्पर्धा सुझोयूत होणार होती. पण चीनमध्ये यावर्षी स्पर्धा आयोजित करण्यास बीडब्ल्यूएफ असमर्थ ठरल्याने ही स्पर्धा फिनलंडमधील वान्टाला देण्याचा निर्णय घेतला,’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतात दुसऱयांदा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा होणार असून यापूर्वी 2009 मध्ये हैदराबादमध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते.
‘वर्ल्ड चॅम्पियनशिपसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळतेय, ही भारतीय संघटनेसाठी आणि देशासाठीही मोठी अचीव्हमेंट आहे,’ असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमांता बिस्वा शर्मा म्हणाले. या प्रतिष्ठेच्या आणि मोठय़ा स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिली याबद्दल बीडब्ल्यूएफचे आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेत जागतिक दर्जाचे खेळाडू सहभागी होणार असल्याने शौकिनांना त्यांचा खेळ पाहण्याची पर्वणी लाभणार असून देशात या खेळाच्या विकासालाही आणखी गती मिळणार आहे, असेही ते म्हणाले.
पीव्ही सिंधू ही महिला एकेरीतील विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन असून तिने दोन रौप्य व दोन कांस्यपदकेही मिळविलेली आहेत. दोन वर्षापूर्वी बॅसेल, स्वित्झर्लंड येथे झालेल्या स्पर्धेत बी. साई प्रणीतने पुरुष एकेरीत पदक जिंकून 36 वर्षांचा पदकांचा दुष्काळ त्याने संपवला होता. याशिवाय सायना नेहवालने 2015 व 2017 मध्ये अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले तर अश्विनी पोनप्पा व ज्वाला गुट्टा यांनी 2011 साली लंडनमध्ये झालेल्या स्पर्धेत महिला दुहेरीचे कांस्यपदक जिंकले आहे. ‘भारतीय बॅडमिंटनपटूंनी जागतिक स्तरावर मोठे यश मिळविले असून सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारताने पदके मिळविली आहेत. आता वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन भारतातच होणार असल्याच्या वृत्ताने खेळाडूंत आणखी प्रेरणा निर्माण होणार आहे,’ असे बीएआयचे सरचिटणीस अजय सिंघानिया म्हणाले. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल त्यांनीही विश्व संघटनेचे आभार मानले आहेत.









