वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2025 साली होणाऱया विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे यजमानपद वेस्ट मिडलँडस् भूषविणार असल्याची घोषणा शनिवारी विश्व कबड्डी फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे. ब्रिटनमधील मिडलँडस्ला या स्पर्धेचे यजमानपद पहिल्यांदाच लाभले आहे.
आशिया खंडामध्ये कबड्डी हा क्रीडा प्रकार अलीकडच्या कालावधीत खूपच प्रसिद्धी मिळवत आहे. दरम्यान विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे यजमानपद पहिल्यांदाच आशिया खंडाबाहेर गेले आहे. या आगामी स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिलांच्या विभागात भारत, इराण आणि पाकिस्तान यांचे संघ सहभागी होत आहेत. 2025 सालातील पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीत सदर स्पर्धा घेतली जाणार असून या स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. पाच हजार वर्षापूर्वी कबड्डी या क्रीडा प्रकाराचे उगमस्थान भारतामध्ये झाले. आता जगातील किमान 50 देशांमध्ये हा क्रीडा प्रकार पाहावयास मिळतो.









